विरोधी पक्षाची वाट चुकतेय : नाना पटोले

Share This News

मुंबई : महाराष्ट्रातील विरोधी पक्षाची वाट चुकत चालली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे नागपूर कनेक्शन पुढे आले होते, त्याचा तपास होणे गरजेचे आहे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली.
अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी ही स्फोटके नागपुरातून खरेदी झाल्याचे पुढे आले. नागपुरातून ही स्फोटके कुणी खरेदी केली, पुढे कुणाला विकली याचा तपास होणे गरजेचे असताना तपास भरकटविण्यात येत आहे. त्याममुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सातत्याने वेगळ्या दिशेने या प्रकाराला नेत असल्याचे आपण विधान सभेतही नमूद केल्याचे पटोले म्हणाले. विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणामध्ये सादर केलेली ‘स्क्रिप्ट’ अतीशय सुंदर आहे, असा टोला त्यांनी लगावला.
परमवीर सिंह, सुबोध जयस्वाल, रश्मी शुक्ला यांच्यासारख्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या हातचे भावले बनू नये असे पटोले म्हणाले. अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांनी अतीशय वेगाने आपल्याकडे ओढुन घेतला. हा प्रकारच मूळात संशयास्पद असल्याचे पटोले म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी केव्हा काय बोलावे, हे सांगणारे फडणवीस कोण होतात असा सवाल त्यांनी केला. फडणवीस यांनी सांगितलेला ‘सीडीआर’ त्यांनी जाहीर करावा अशी मागणी पटोले यांनी केली. राज्यातील आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांना केंद्र सरकार दमदाटी करीत आहे. त्यांच्यावर दबाव आणण्यात येत आहे. देशातील अनेक राज्यात हा प्रकार सुरू आहे, असे पटोले म्हणाले. महाराष्ट्राचे राज्यपाल कार्यालय भाजपचे संपर्क कार्यालय झाले आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम महाराष्ट्रातील भाजपच करीत आहे. त्याला राज्यपाल साथ देत असल्याचे पटोले यांनी नमूद केले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.