दोन वर्षात पूर्ण होणार बायपास रस्ता The bypass road will be completed in two years

Share This News

भंडारा,दि.15ः– शहरातून छेदून जाणारा राष्ट्रीय महामार्ग दुपदरी असून यावर जड वाहतुकीचा मोठा ताण आहे. याशिवाय या मार्गावर बहुतांश शासकीय कार्यालये असल्याने नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. त्यामुळे दररोज होणार्‍या अपघातांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवीन बायपास रस्त्याला वर्षभरापूर्वी मंजूरी मिळाली होती. आता या कामाचे टेंडर निघाले आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार असून दोन वर्षात रस्त्याचे काम पूर्णत्वास येणार आहे.
मुंबई ते कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग भंडारा शहरातून जातो. नागपूरपासून मुजबीपर्यंत चारपदरी असलेला हा मार्ग भंडारा शहरात येताच दोन पदरी होतो. त्यामुळे वाहतुकीचा मोठा ताण पडून आजवर अनेक अपघात झाले आहेत. सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. त्यामुळे नवीन बायपास रस्त्यासाठी वर्षभरापूर्वी खा. सुनील मेंढे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. ना. गडकरी यांनी नवीन बायपास रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली. अलिकडेच या कामाचे टेंडर निघाले आहेत. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
सहापदरी असलेल्या या बायपास रस्त्याची लांबी १४ किलोमीटर असणार आहे. यासाठी ५६.८९ हे.आर. जमिन १३ गावांमधून संपादीत करायची होती. आजीमाबाद, बेला, भिलेवाडा, दवडीपार, दिघोरी, गिरोला, हंसापूर, खापा, कोरंभी, पलाडी, सालेबर्डी, सिरसघाट, उमरी येथील जमिनीचे संपादनाचे काम सुरू झाले होते. त्यातील ९0 टक्के भुसंपादनाची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित भूसंपादन लवकरच होणार आहे. या रस्त्याच्या प्रत्यक्ष बांधकामाचा खर्च ६१८.७५ कोटी रुपये असून भुसंपादन व युटीलीटी शिफ्टिींगसह ७३८ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च यावर होणार आहे.

असा असेल नवीन बायपास मार्ग
प्रस्तावित बायपास मार्ग शहापूर, बेला वरून वळण घेऊन तीर्थक्षेत्र कोरंभी येथे वैनगंगेवर नवीन पूल बांधून गिरोला, भिलेवाडा मार्गावर चारपदरी रस्त्याला मिळणार आहे. या बायपास रस्त्याचे काम पूर्ण होताच सर्व प्रवासी व माल वाहतूक येथून वळवली जाईल. त्यामुळे दुपदरी राष्ट्रीय महामार्गावर होणार्‍या अपघाताला आळा घालता येणार आहे. या रस्त्यावर उड्डाणपूल, ४ मोठे पूल, ६ लहान वाहन भूमिगत रस्ते, सर्व्हिस रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजुला ४ बस थांबे राहणार आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.