कार चालकाला लूटणारी टोळी गजाआड
चाकुच्या धाकावर कार चालकासह त्याच्या मित्रांना लूटणार्या टोळीला नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना गजाआड केले. त्यांच्या ताब्यातून लुटमारीतील सर्व साहित्य जप्त करण्यात आले. रमेश उर्फ पुट्टी रामकिसन रविदास (३१) रा. वॉर्ड क्रमांक ३, चनकापूर, खापरखेडा, शहजाद नसीमउद्दीन सिद्दीकी (३६) रा. सिल्लेवाडा, टीपू उर्फ शकीर अली वल्द हसमत अली इद्रीसी (२८) रा. वॉर्ड क्रमांक ३, वलनी, आशिष विजय शास्त्री (१९) रा. दहेगाव, निखील अशोक पासवान (२६) रा. दहेगाव, खापरखेडा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
घटनेच्या दिवशी गुरुवार, १७ डिसेंबर रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास प्रदीप अभिमन्यू साखरे रा. चनकापूर हे आपल्या दोन मित्रांसह होंडा सीटी कारने खापरखेडा येथून पारडी मार्गे ईटगावकडे रात्री १0 वाजतादरम्यान कन्हान नदीच्या पुलाजवळ, पारडी शिवारात पोहचताच मागून येणार्या तीन दुचाकी त्यांच्या कारसमोर उभ्या करून आरोपींनी चाकुच्या धाकावर सोन्याची चेन, सोन्याचे ब्रॅसलेट, दोन सोन्याच्या अंगठय़ा, कानातील सोन्याची बाली, मोबाईल असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल लुटून घटनास्थळावरून पसार झाले होते. घटनेची तक्रार पारशिवनी पोलिसात देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेने एक विशेष पथक तयार करून गुन्हाचा तपास सुरू केला.
तीन दिवसांनंतर या प्रकरणात उमेश रविदास हा या गुन्ह्यात सहभागी असल्याचे पोलिसांना कळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतली. त्याला सखोल विचारपूस केल्यानंतर त्याने इतर आरोपींची नावे सांगितले व मुद्देमाल हा टीपू याच्या ताब्यात असल्याचे सांगितले. पोलिसांनी टीपूसह इतर आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एक लोखंडी चाकू व लुटीतील दागिने आणि मोबाईल जप्त केले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे जिल्हा अधीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलिस उपनिरीक्षक सचिन मते, जावेद शेख, सहायक फौजदार लख्मीप्रसाद दुबे, हेंड कॉन्स्टेबल विनोद काळे, नायक पोलिस शिपाई शैलेश यादव, अरविंद भगत, सत्यशिल कोठारे, पोलिस शिपाई वीरेंद्र नरड, प्रणय बनाफर, सतीश राठोड व चालक पोलिस शिपाई साहेबराव बहाळे यांच्या पथकाने पार पाडली.