सीबीआय माजी गृहमंत्री देशमुख यांच्या स्वीय सहायकांचे जबाब नोंदविणार

Share This News

नवी दिल्लीः लाचखोरीच्या आरोपांत अडकलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना सीबीआयने समन्स बजावले असून त्यांचा जबाब नोंदविला जाणारे. कुंदन आणि पलांडे अशी या स्वीय सहायकांची नावे असून त्यांचा उल्लेख परमबीर सिंह आणि वाझे या दोघांच्या पत्रांमध्ये झालेला आहे.
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या लाचखोरींच्या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी सुरु आहे. सीबीआयने या प्रकरणी काही दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणात सीबीआयकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी होणार असली तरी सीबीआयने त्यापूर्वी या प्रकरणाशी संबंधित सर्वांचे जबाब नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन आणि पलांडे या दोघांना समन्स बजावून जबाब नोंदविण्यासाठी बोलावण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोघांचाही उल्लेख परमबीर सिंह आणि वाझे यांच्या पत्रात झालेला आहे. देशमुख यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिलेली कथित खंडणी वसुलीची सूचना या दोघांच्या समक्ष दिली होती, असा परमबीर सिंह आणि वाझे यांचा आरोप आहे. पंधरा दिवसात सीबीआयला या प्रकरणी प्राथमिक अहवाल न्यायालयात सादर करावयाचा असून तत्पूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.