समाजमन

Share This News

त्या महापुरुषाच्या वास्तव्याने वर्धा हे शहर प्रसिद्ध आहे.

वर्ध्यात गेल्यावर आश्रमात भेट तर दिलीच पाहिजे. असा विचार करुन आश्रमाकडे निघालो. आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ आलो. तेवढ्यात कुणीतरी  मोठ्यामोठ्याने भांडत असल्याच्या आवाज
आला.  जरा कानोसा घ्यावासा वाटल्याने प्रवेशद्वाराजवळच बाजुला बसलेल्या आजोबास विचारावे म्हणून जवळ गेलो. बघितले तर ते वृद्ध रडत होते. अत्यंत दु:खातिरेकाने त्यांच्या शरिरास भयकंप सुटला होता.  मला वाटले की त्या वृध्दास घरच्यांनी सांभाळण्यास नकार दिला असावा म्हणून आयुष्याच्या संध्याकाळी विपन्नावस्थेत दिवस काढण्याची वेळ आली म्हणून ते रडत असावेत. 
मी चौकशी केली. 
आजोबा का रडताय ? मी काही मदत करु का ? 
आजोबांनी मोठा आवंढा गिळत स्वत:स सावरले अन बोलु लागले. 
नको बाळ. माझ दु:ख समजेल अस कोणीही नाही आता. 
आजोबा आतून पुर्ण कोलमडले होते. उध्वस्त झाले होते. 

आजोबा आपल्याला की शारिरीक त्रास होत असेल तर आपण दवाखान्यात जाऊन उपचार घेउ. तुम्ही नका काळजी करू मी घेउन जातो तुम्हाला.  बाळा, तुझ्या सहकार्याबद्दल धन्यवाद.  पण माझा त्रास शारीरिक नाही रे.  मी समजलो, तुम्हाला नातेवाईकांनी त्रास दिलाय न. तुमची जबाबदारी नको म्हणत आहेत न. अहो आजोबा तुमचे दु:ख मी समजु शकतो. पण खरच सांगतो नका वाईट वाटून घेउ.  बाळा, अरे मला मानमरातब, सुख सोइ, सत्ता, पैसा नको होता रे.  (आता मात्र मला समजेना आजोबांचे नेमके दु:ख काय आहे ते. कारण सुख सोइ, सन्मान अन सत्ता ,पैसा संपत्ती याचीच तर अपेक्षा असते ना.)  माझे चेहऱ्यावरील भाव त्या आजोबानी बरोबर ओळखले अन आजोबा बोलू लागले.  बाळा, अरे जीवनभर मी अकरा व्रतांचा अंगिकार केला. सामान्य लोकांचे दु:ख वेदना समजून त्याना दु:ख मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले.  अहिंसेच्या मार्गाने परकीय आक्रमकांशी लढलो.  सत्तेचा तिळमात्रही मोह धरला नाही. संपत्तीचा संग्रह केला नाही.  श्रमप्रतिष्ठा महत्वाची मानली.  माझा कामाचा जगभर आदर केला गेला. बहुतेकानी त्याचा अंगिकार केला. इतकेच काय माझ्या मताचा विरोध करणाऱ्याना पण माझे विचार पटु लागले.  माझ्या जीवन संदेशाचा सर्व जगभर प्रसार प्रचार करण्यासाठी मी स्थापन केलेली संस्था चांगले काम करते आहे हे बघून आयुष्य सार्थकी झाल्यासारखे वाटू लागले.  हळूहळू का असेना समाजात सकारात्मक बदल होत असलेले पाहून मला धन्यता, प्रसन्नता वाटु
लागली. 
मग ? मी प्रश्न केला. 

आजोबानी आश्रमाकडे बघून मला विचारले हा भांडणाचा आवाज ऐकतो आहेस ना?  हो आजोबा खरेतर त्याचीच चौकशी करण्यासाठी मी तुमच्या जवळ आलो होतो. 
अरे बाळा, माझ्या अकरा व्रतांचा अंगिकार करुन देशभर प्रसार प्रचार करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी होती तेच भांडत आहेत. 
का ? मी विचारले. 
सत्तेसाठी. अत्यंत पराभूत मानसिकतेने आजोबा उत्तरले. 
जणु काही अंतकरणातील भारदस्त दुखाने शब्दांचे वजन न पेलवल्याने उसने अवसान आणून
शब्द उच्चारले गेले. 
बापरे, माझ्या तोंडून एवढाच शब्द निघाला. 
आजोबा बोलू लागले 
हाच त्रास बघवत नाही म्हणून मी इथेच बसून असतो. मला तीव्र वेदना होतात आश्रमाचे ही
अवस्था बघून. 
आजोबांचे अंत:करण पुन्हा भरून आल्याने शब्द अडखळत होते. 
मी फक्त हार घालण्यापुरता उरलोय. जयजयकार केला जातो. अन माझेच अनुयायी माझ्या
जीवनव्रताची खिल्ली उडवतात. 
ज्यांनी माझ्या कार्याचा प्रसार प्रचार करायचा त्यानाच जर मी समजलो नाही तर ते इतर
लोकांना काय समजावणार? 
आज सत्तेसाठी भांडत आहेत. उद्या कदाचित हिंसाही करतील. 
अन त्या दिवशी मी पूर्ण हारलेलो असेन. 
आजोबानी शब्दाना विराम देत अश्रूंना बोलण्यास सांगितले. 
मलाही सुचेना आजोबांचे सांत्वन कसे करावे ते. कारण शब्दांचे कर्तुत्व संपले होते. 

आजोबांच्या पायाशी बसलो. त्यांचे थरथरते हात माझ्या हातानी घट्ट धरले अन त्या स्पर्शातुन
माझ्या भावना त्यांच्या अंतकरणापर्यंत पोहोचवल्या. 
त्याच्या उत्तरादाखल आजोबांनीही माझ्या डोक्यावरून हात फिरवला. 
तो क्षण आम्हा दोघांनाही अपार समाधान देउन गेला. आजोबा उठले अन आपली काठी घेऊन
चालु लागले. 
ती सावली एका युगाची कहाणी सांगत होती. मात्र त्याच सावलीला  स्वतःच्याच अनुयायांनी
दिलेल्या दु:खाची जाडीभरडी किनार होती. 
मला आता आश्रमात जाण्याचे काहीही कारण उरले नव्हते. तो गोंगाट मात्र अजुनही चालूच होता.

  • प्रसाद जोशी


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.