भंडारा-शाळेतील जीर्ण भिंत कोसळली; ५ विद्यार्थी जखमी
भंडारा- शाळेच्या वर्गातील जीर्ण भिंत कोसळल्याने वर्गात उपस्थित असलेले ५ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना तुमसर तालुक्यातील लोहारा येथील स्व. रतिराम टेंभरे शाळेत घडली.
सयुरी भुजबल नेवारे (१३) रा. गोवारीटोला, सोनाली शिवशंकर शिवरकर (१३), उमाशंकर अनिल सपाटे (१३) रा. धोप अशी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहे. उर्वरित विद्यार्थी घरीच उपचार घेत आहेत.
घटनेच्या दिवशी वर्ग आठमधील तासीका संपल्यानंतर काही विद्यार्थी वर्गातच बसून होते. तेवढय़ात अचानक शाळेच्या वर्गाची जीर्ण भिंत कोसळली. यात पाच विद्यार्थी जखमी झाले. एक विद्यार्थी गंभीर असून त्याला तुमसर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सदर घटना ही शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याची दिसून येते. जी भिंत कोसळली ती अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत होती. त्या भिंतीला भेगा पडलेल्या होत्या. तरीसुद्धा शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केले. या घटनेला दोन ते तीन दिवस होऊन सुद्धा शाळा प्रशासनाने व शिक्षण विभागाने या घटनेची दखल घेतली नाही.