मेडिट्रिनाचे संचालक डॉ. पालतेवार फरार
नागपूर : बिल घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल होताच रामदासपेठेतील मेडिट्रिना हॉस्पिटलचे संचालक व मुख्य व्यवस्थापक डॉ. समीर नारायण पालतेवार (वय ५०, रा. प्रेस्टिज अपार्टमेंट, रामदासपेठ) फरार झाले आहेत.
पालतेवार यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होताच आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी हॉस्पिटलची झडती घेत कम्प्युटरमधील हार्डडिस्क जप्त केली. सायबर तज्ज्ञांकडून या हार्डडिस्कची तपासणी करण्यात येत आहे. १ एप्रिल २०१९ ते १९ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत भंडारा येथील विवेकानंद हटवार, भद्रावती येथील पुरुषोत्तम खापर्डे व रामटेक येथील वसंत डाबरे यांच्यावर मेडिट्रिनामध्ये उपचार करण्यात आले. तिघांच्याही बिलात बदल करण्यात येऊन प्रत्यक्षात जमा रक्कम कमी दाखविण्यात आली. ही बाब आयकर सल्लागार व मेडिट्रिनाचे संचालक गणेश रामचंद्र चक्करवार (वय ६१, रा. शुभम रिजन्सी, रामदासपेठ) यांच्या निदर्शनास आली. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांकडे तक्रार केली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हेशाखेचे उपायुक्त विवेक मसाळ, पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी तक्रारीची चौकशी केली. चौकशीदरम्यान घोटाळा झाल्याचे समोर आले. त्यानंतर शनिवारी पालतेवार व अन्य आरोपींविरुद्ध फसवणूक, माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल होताच पोलिसांनी पालतेवार यांना चौकशीसाठी आर्थिक गुन्हेशाखेच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली. मात्र, शनिवारी व रविवारी पालतेवार चौकशीसाठी हजर झाले नाहीत. पोलिसांनी शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत. ‘पालतेवार फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे’, अशी माहिती आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी दिली.