नक्षलवादविरोधी लढाई अधिक तीव्र होईल

Share This News

रायपूर(वृत्तसंस्था)- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगड येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर नक्षलवादाविरोधातील आपली लढाई आणखीन ताकदीने लढून आणि या लढाईत आपण नक्कीच विजयी होऊ, असा विश्‍वास व्यक्त केला. संरक्षण दलांची पथके आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगडच्या जंगलात झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद झाल्याची माहिती रविवारी समोर आली. नक्षलवाद्यांनी घडवलेले हे अलीकडच्या काळातील मोठे हत्याकांड ठरले असून याच पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली. सुकमा आणि बीजापूर जिल्ह्यांच्या सीमाभागात ज्या ठिकाणी जवानांवर हा हल्ला झाला त्या ठिकाणीची पहाणी शाह यांनी केली तसेच त्यांनी शहीद जवानांना देशाच्या वतीने श्रद्धांजलीही अर्पण केली.
पंतप्रधान, केंद्र सरकार आणि संपूर्ण देशाच्या वतीने मी या नक्षलवादी हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या संरक्षण दलातील जवानांना र्शद्धांजली अर्पण करतो. या जवानांचे बलिदान देश कायमच लक्षात ठेवले. या जवानांनी नक्षलवादाविरोधात दिलेला हा निर्णायक लढा कायमच स्मरणात राहील, असे शहा यांनी जगदालपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
मागील काही वर्षांपासून नक्षलवादाविरोधातील लढाई ही निर्णायक वळणावर पोहचल्याचे पहायला मिळत आहे. मात्र या दुर्दैवी हल्ल्यामुळे नक्षलवादाविरोधातील लढाई अधिक तीव्र झालीय, असेही शाह यांनी स्पष्ट केले आहे. मी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बाघेल आणि संरक्षण दलाच्या अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली. या अधिकार्‍यांनी हा लढा असाच सुरू ठेवला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. यावरुन आपल्या संरक्षण दलातील जवानांचे नक्षलवादाविरोधात लढा देण्याचे धैर्य कायम असल्याचे दिसून येत आहे, असे शहा म्हणाले.
पुढे बोलताना शाह यांनी, मी प्रत्येक भारतीयाला आश्‍वासन देतो की ही नक्षलवादाविरोधातील लढाई भविष्यात अधिक तीव्र होणार असून शेवटी आपलाच विजय होणार आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.