जेवण करत असलेल्या एका चिमुरडीला बिबट्याने उचलून नेल्याची हृदयद्रावक घटना.

Share This News

घराच्या अंगणात आजोबांसोबत जेवण करणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुरडीला बिबट्यानं उचलून नेल्याची भयंकर घटना नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी गावाजवळ घडली आहे

अहमदनगर: जेवण करत असलेल्या एका चिमुरडीला बिबट्याने उचलून नेल्याची हृदयद्रावक घटना  पार्थदी  तालुक्यातील मढी गावाजवळ घडली. आजोबांसोबत अंगणात जेवण करणाऱ्या तीन वर्षांच्या मुलीला बिबट्याने उचलून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा अर्धवट अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

गर्भगिरीच्या डोंगर रांगेत आमदरा वस्ती येथे ही घटना घडली. श्रेया सूरज साळवे (वय ३) ही चिमुरडी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घराच्या अंगणात आजी-आजोबांसोबत जेवण करीत होती. तिचे चुलतेही तेथे होते. अचानक बिबट्या आला. काही कळायच्या आतच त्याने श्रेयावर हल्ला केला. आरडाओरड झाल्याने तिला उचलून घेऊन तो पळून गेला. या घटनेची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिक धावून आले. वनविभागाचे कर्मचारीही आले. सर्वांनी आसपास शोधाशोध केली. रात्रभर शोध घेऊन काहीही मिळाले नाही. ही घटना घडण्यापूर्वी शेजारी एका वस्तीवरही बिबट्या येऊन गेल्याची माहिती मिळाली. तेथे उषा विजय साळवे या महिलेवर हल्ला करण्याचा बिबट्याने प्रयत्न केला होता. मात्र, त्या सावध झाल्या आणि बिबट्याला पाहून इतरांनी आरडाओरड केल्याने तो पळून गेला. त्यानंतर हाच बिबट्या जवळच्याच वस्तीवर आला असावा आणि त्यानेच श्रेयावर हल्ला केल्याचा संशय आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी साळवे यांच्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर श्रेयाचा अर्धवट मृतदेह आढळून आला. मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. तिच्यावर बिबट्यानेच हल्ला केल्याचे आढळून आले आहे. शिवाय या परिसरात बिबट्याच्या पंजाचे ठसे आढळून आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी सांगितले.

अकोले-संगमनेर पाठोपाठ गर्भगिरीच्या डोंगररांगेत सर्वदूर बिबट्यांचा वावर आणि हल्ले सुरूच आहेत. पावसामुळे डोंगररांगेतील हिरवाई बहरली आहे. झाडे वाढल्याने डोंगरातही अडोसा झाला आहे. त्यातूनच बिबटे थेट मानवी वस्तीपर्यंत धाव घेत आहेत. शेतीच्या सोयीसाठी या भागातील लोक वस्ती करून राहतात. या हल्ल्याच्या घटनेनंतर आता या परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी भागातील कार्यकर्त्यांनी वनविभागाकडे केली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.