डॉक्टराच्या घरातून शंभर तोळे सोने, दहा लाख रोकड लंपास झाल्याची माहिती खोटी…!|The information that one hundred ounces of gold and ten lakh cash was stolen from the doctor’s house is false!

Share This News

औरंंगाबाद, दि.25-– सोशलमिडीयावर डॉक्टरच्या घरातून चोरट्यांनी शंभर तोळे सोने आणि दहा लाख रुपये रोख लंपास केल्याचा मँसेज व्हायरल झाल्याने शहर पोलिसांची झोपच उडाली. माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता व वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट घेवून पाहणी केल्यानंतर पोलीस उपायुक्त दिपक गि-हे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले प्रथमदर्शनी चोरीचा प्रयत्न असून ऐवज पळवल्याचा प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले.
मंगळसुत्र, सोनसाखळी, मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांपुढे हतबल झालेले औरंगाबादचे पोलीस बुधवारी एका महिला डॉक्टरच्या घरातून शंभर तोळे सोने आणि 10 लाख रुपये रोख ऐवजाची चोरी झाल्याची माहिती कळताच अक्षरशः हलले होते.
प्रतापनगरातील जागृत हनुमान मंदिरासमोर दंत चिकित्सक डॉ. सुषमा सोनी एक मोठा बंगला आहे. त्यांचे पती जयंत सोनी हे वाळूजमध्ये एक कंपनी चालवतात. सोनी दाम्पत्याला दोन मुली असून त्यातील एकीच्या मणक्याशी संबंधित आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्व कुटुंब तिरुपतीला गेलेले आहे. घराकडे लक्ष ठेवण्यासाठी एक कर्मचारी असून तो सकाळी नऊच्या सुमारास आला तेव्हा त्याला मुख्य हॉलचा दरवाजा तोडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने सोनी दाम्पत्याला याची माहिती दिली. चोरीच्या शक्यतेने सोनी दाम्पत्याने प्रथम 100 तोळे व 10 लाख रुपये चोरी गेला असा अंदाज व्यक्त केला. त्यासंदर्भातील माहिती उस्मानपुरा पोलिसांना कळवली. त्यानंतर या घटनेची माहिती वरिष्ठ अधिका-यांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, दीपक गि-हे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रविंद्र साळोखे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप तारे, सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह श्वान पथक, ठसे तज्ञ आदींचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. सोनी दाम्पत्याकडून त्यांच्या एका निकटवर्तीय आणि सेवानिवृत्त पोलिस अधिका-याने घरातील सर्व किमती वस्तुंची पाहणी करून त्याची माहिती सोनी दांम्पत्याला दिली. सोनी दांम्पत्याने कोणतीही वस्तू चोरीला गेली नसल्याचे सांगितल्यावर पोलिसांसह उपस्थित सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली जाणार असल्याचे उपायुक्त दीपक गि-हे यांनी यावेळी सांगितले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.