हिरवाईच्या गोष्टी सम्राटही येथे हरला……!

Share This News

सह्यान्द्री व सातपुडा पर्वतरांगाच नव्हे तर इतरही भूस्थित परिसंस्था महत्वाच्या आहेत. त्या प्रत्येक परिसंस्थातील वन्यजीवन हे पर्यावरण संतुलनाचे प्रतिक आहे. पक्ष्यांची पर्यावरण संतुलनात महत्वाची भूमिका आहे. महाराष्ट्रात आजवर ५५७ पक्ष्यांची नोंद झाली आहे. भारतातील १२८४ पक्ष्यांचा तुलनेत ४३ % पक्षी महाराष्ट्रात आढळतात. महाराष्ट्रातील अनेक अभयारण्ये केवळ पक्षी अभयारण्ये म्हणून परिचित आहेत. नान्नज अभयारण्य सुद्धा माळढोक पक्ष्याची पंढरी मानले जाते. हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे. सन १९७९ मध्ये जाहीर झालेल्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ ८४९६ चौ.कि.मी इतके होते. मात्र आता माळढोक पक्षी अभयारण्याचे क्षेत्र फक्त ३६६ चौ.कि.मी. ठेवले आहे. सोलापूर व नगर जिल्ह्यातील मोठ्या भूभागाचा यात समावेश होतो. हे अभयारण्य माळढोक पक्षी संरक्षणासाठी तयार केलेले आहे. फक्त एका पक्ष्यासाठी एवढा मोठा भूभाग संरक्षित करण्याची ही दुर्मिळ घटना आहे. अभयारण्य परिसर कमी पावसाचा प्रदेश आहे. संपूर्ण अधिवास मुख्यत्वे गवताळ असून तुरळक प्रमाणात काटेरी वनस्पती आढळतात. बाभूळ, हिवर, आपटा, शीसव, तारवाड, अमोणी, कांचरी यासारख्या काटेरी वनस्पती येथे आहेत. तडस, काळवीट, लांडगा, खोकड, मुंगुस, रानमांजर ई. प्राण्यांचा वावर आहे. आय.यु.सी.एन. च्या तांबड्या यादीत अत्यंत दुर्मिळ प्रजाती असलेला माळढोक आता शेवटच्या घटका मोजत
आहे. माळढोकाचे शास्त्रीय नाव ‘आर्डेओटीस निग्रीसेपस’ (Ardeotis nigriceps) असून हा भारत व लगतच्या पाकिस्तानातील कोरड्या प्रांतामध्ये आढळणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे.

इंग्रजीत ‘ग्रेट इंडियन बस्टार्ड’ (Great Indian Bustard) तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात हुम’ नावाने ओळखले जाते. अकोला जिल्ह्यात ‘ढोग’ तर यवतमाळ जिल्ह्यात ‘भांडेवडी’ नावाने परिचित आहे. इतर पक्ष्यांच्या तुलनेत धिप्पाड व मोठे शरीर, उंच पाय यामुळे हा पक्षी शहामृगासारखा दिसतो. भारतातील कोरड्या माळरानांवर एकेकाळी सहज दिसणाऱ्या ह्या पक्ष्यांची संख्या सन १९६९ मध्ये १,२६०, १९७८ मध्ये ७४५, २००० मध्ये ६००, २०१० मध्ये ३०० तर २०११ मध्ये केवळ २५० इतकी असल्याचा अंदाज करण्यात आला होता. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची मधील या पक्षाचे मुख्य खाद्य लहान व मोठे किडे, नाकतोडे, बीजे असून हा मिश्राहारी प्रकारात मोडतो. महाराष्ट्रात सन २०१७ मध्ये भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून, बी.एन.एच.एस. च्या वतीने सर्वेक्षण केले. आपल्या राज्यात ३१ पथकाद्वारे ही पाहणी करण्यात आली. या सर्वेक्षणात माळढोक पक्षी आढळला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

माळढोक राजस्थान, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील सोलापूर, नागपूर, चंद्रपूर अहमदनगर, बीड जिल्ह्यात आढळतो. या पक्ष्याला पर्सिध्द शास्त्रज्ञ विगर्स यांनी १८३१ मध्ये जगासमोर आणले. नरपक्षी माद्यांना आकर्षित करण्यासाठी दरवर्षी एका विशिष्ट जागी उभा राहून आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करतो. डौलदार नृत्य करून स्वत:भोवती गिरकी घेतो, शेपूट उंचावतो आणि ‘हुम्म’ असा आवाजकाढतो. हा आवाज २-३ किमी अंतरापर्यंत ऐकू जाऊ शकतो. हा पक्षी बहुभार्या आहे. एक नर अनेक माद्यांशी मीलन करतो. मीलनानंतर मादी निर्जन ठिकाणी उघडय़ा जमिनीवर एक अंडे घालते. सुमारे २५ दिवसांनंतर अंडय़ातून पिल्लू बाहेर येते. पिल्लू ७५ दिवसांनी उडण्यासाठी सज्ज होऊन एक वर्षानंतर आईपासून स्वतंत्र होते.


हा दीर्घकाळ चालणारा विणीचा हंगाम पिल्लांसाठी घातक ठरतो. अंडी उबवणीचे २५ दिवस, उडायला येईपर्यंतचे ७५ दिवस असे तब्बल १०० दिवस यात खर्ची होतात. यामुळे जन्माला आलेल्या सर्व पिल्लांपैकी सुमारे ५०% पिल्ले या दरम्यान मृत्युमुखी पडतात. भयाण वास्तव असे की फक्त २५% पिल्लेच प्रौढ होईपर्यंत जगतात. विजेच्या तारांना धडकून होणारे अपघाती मृत्यू, कीटकनाशकांमुळे होणारी विषबाधा, भटक्या कुत्र्यांकडून होणारी पिल्लांची व प्रौढ पक्ष्यांची शिकार, गुरांच्या पायदळी तुडवले जाण्यामुळे होणारा अंडय़ांचा व पिल्लांचा नाश, अधिवास धोक्यात येणेयामुळे हे पक्षी धोक्यात आलेत. नष्ट होणारा अधिवास ही सर्वात जटिल समस्या आहे. शेती आणि उद्योगधंद्यासाठी माळरानांचा मोठय़ा प्रमाणात नाश होत आहे. माळरानांच्या अयोग्य आणि अशास्त्रीय नियोजनामुळे ती आता संपुष्टातयेत आहे. माळढोक पक्ष्याच्या आधाराने येथील जैवविविधता सुखाने नांदत असतांनाच मात्र आता या जंगलाला मानवाची दृष्ट लागली आहे. आज येथील माळढोक शेवटच्या घटिका मोजत आहे. वन विभागाच्या व स्थानिक वन्यजीवप्रेमीच्या प्रयत्नांना येथे सपशेल अपयश आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. करोडो रुपये खर्च करूनही आम्ही माळढोकाला वाचविण्यात अपयशी ठरलो आहे. ही बाब मानाला चटका देणारी असून आत्मचिंतन करायला भाग पडणारी आहे. एकूणच काय तर मनुष्याचा हस्तक्षेप नसलेला अधिवास व शिकाऱ्यांपासुन संरक्षण मिळाले तर येथेही नव्याने माळढोकाचा संसार फुलायला लागेल यात शंकाच नाही.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.