अँडमिशनचे आमिष; २६ लाखांची फसवणूक
नागपूर : मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला अँडमिशनचे आमिष दाखवत तब्बल २६ लाख रुपयांच्या फसवणुकीची घटना बजाजनगर पोलिस ठाणेअंतर्गत उघडकीस आली आहे.
या प्रकरणी प्राप्त तक्रारीनंतर पोलिसांनी पुण्यातील चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एच ८, पूर्वा बिल्डिंग, लक्ष्मीनगर येथे राहणारे फिर्यादी अशोक नंदलाल सोनगडे (वय ५0) यांनी त्याच्या मुलीची एमबीबीएसला अँडमिशनसाठी रितसर ऑनलाईन अर्ज केला होता. दरम्यान, आरोपी धिरजकुमार (रा. हैद्राबाद), विक्की सिंग, कार्तिक ससाणे आणि पवार (रा. पुणे) यांनी संगनमत करून सोनगडे यांना कॉल केला. पुणे येथील श्रीमती काशिबाई नवणे मेडिकल कॉलेज व जनरल हॉस्पिटल येथे एमबीबीएस येथे दाखला मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी फिर्यादीला दाखविले. चक्क फिर्यादींना प्रवेशाची खोटी पावती देऊन त्यांच्याकडून वेळोवेळी २६ लाख रुपये घेतले. परंतु, आरोपींनी कुठल्याही प्रकारची अँडमिशन करून दिली नाही. यानंतर फिर्यादी यांनी वारंवार आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी त्यांना पैसे परत करण्यचे वारंवार आश्वासन दिले. मात्र, कुठलेही पैसे परत केले नाही. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर फिर्यादी यांनी बजाजनगर पोलिसात तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी पुण्यातील चार आरोपींविरुद्घ ४२0, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.