विधान परिषदेच्या 6 जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून सर्वस्व पणाला! कोणत्या मतदारसंघात कुणामध्ये मुख्य लढत?

Share This News

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी होणारी निवडणूक यंदा पहिल्यांदाच एवढी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तानाट्यानंतर पार पडणाऱ्या या पहिल्या मोठ्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मुंबई: राज्यातील विधान परिषदेच्या ६ जागांसाठी  पार पडलेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास काहीसा उशीर लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेच्या या 6 जागांसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपनं सर्वस्व पणाला लावलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी होणारी निवडणूक यंदा पहिल्यांदाच एवढी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तानाट्यानंतर पार पडणाऱ्या या पहिल्या मोठ्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मतदारसंघ आणि मुख्य लढत

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचं पारडं जड मानलं जातंय. कारण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघाचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. पुणे पदवीधरची निवडणूक भाजपसाठी वनवे असल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. असं असलं तरी भाजपविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महाविकास आघाडी अशी लढत होत असल्यानं ही निवडणूक भाजपसाठी तेवढी सोपी राहिलेली नाही.

पुण्यात यंदा भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांना पदवीधरच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे देशमुख आणि लाड यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. दुसरीकडे भाजप आणि महाविकास आघाडीसमोर मनसेच्या रुपाली पाटील आणि जनता दलाचे शरद पाटील यांनीही आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात कोण बाजी मारणार हे सांगणं नक्कीच सोपं नाही.

दुसरीकडे पुणे शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत, भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार आणि काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर यांच्यात लढत होत आहे. दत्तात्रय सावंत आणि जितेंद्र पवार हे सोलापूरचे आहेत, तर आसगावकर कोल्हापूरचे. दरम्यान जो उमेदवार पुण्यातून सर्वाधित मतं घेणार तो उमेदवार विजयी ठरण्याची शक्यता अधिक आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघ

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपनं विद्यमान आमदारांना डावलून महापौर संदीप जोशी यांना मैदानात उतरवलं आहे. तर काँग्रेसकडून नव्या दमाच्या अभिजीत वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघाचं नेतृत्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही केलं आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ आजवर सोपा मानला जातो. पण यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना असल्यानं भाजपला अधिक जोमाने काम करावं लागलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक बडे नेते नागपुरात प्रचारासाठी मैदानात उतरले होते. तर काँग्रेसकडूनही मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकरावर ठाकरे, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी प्रचार केला. त्यामुळे नागपूरची जागा राखण्यात भाजपला यश मिळतं की नव्या दमाचे अभिजीत वंजारी काँग्रेसला विजय मिळवून देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना हॅटट्रिक करण्याची संधी आहे. तर भाजपचे उमेदवार शिरिष बोराळकर यांना मागील परभवाचा वचपा काढण्याची संधी होती. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप तसंच दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न झाले. यंदा औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे. मतदानाची टक्केवारी वाढणं म्हणजे सत्ताधाऱ्यांना धक्का मानला जातो. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजपचे उमेदवार शिरिष बोराळकर यांनी व्यक्त केलाय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनीही आपलाच विजय निश्चित असल्याचं म्हटलंय. दरम्यान, विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपवासी झाल्यामुळे चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक तितकी सोपी राहिलेली नाही.

अमरावती शिक्षक मतदारसंघ

अमरावती शिक्षक मतदारसंघात वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपकडून नितीन धांडे निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान भाजप नेते अनिल बोंडे यांच्या बहीण संगिता शिंदेही मैदानात असल्याने भाजप उमेदवारासमोरिल डोकेदुखी वाढली आहे.

धुळे-नंदुरबार विधान परिषद निवडणूक

धुळे-नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचं संख्याबळ पाहता भाजपचं पारडं जड असल्यानं भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास भाजपाच्या गोटातून व्यक्त होत आहे. तर, या निवडणुकीत परिवर्तन होईल असा आशावाद महाविकास आघाडी गटाला आहे. काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या अमरीश पटेल (Amrish Patel) तसेच भाजप मधून काँग्रेसमध्ये गेलेल्या अभिजीत पाटील (Abhijit Patil) या दोघांमध्ये ही लढत होत आहे.

अमरीश पटेल यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा कालावधी 14 डिसेंबर 2021 या दिवशी पूर्ण होत होता. मात्र तत्पूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्यानं केवळ 12 महिन्यांचा कालावधी निवडून येणाऱ्या उमेदवाराला मिळणार आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात झालेल्या राजकीय घडामोडींचा या निवडणुकीत भाजपला फायदा होणार की महाविकास आघाडी सरकारला फायदा होणार हे पाहावं लागेल.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.