कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची गरज, मुख्यमंत्री घोषणा करणार- राजेश टोपे

Share This News

मुंबई

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि दिवसागणिक झपाट्यानं वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या यामुळे देशासह राज्यात आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आला आहे.. अशातच राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. यासोबतच राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लॉकडाऊनबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, पंतप्रधानांनी लॉकडाऊन शेवटचा पर्याय असल्याचं म्हटलं असलं, तरी महाराष्ट्रातील सध्याच्या अशंतः लॉकडाऊनच्या काळातील जी परिस्थिती आहे, ज्यामध्ये उपलब्ध बेड, उपलब्ध ऑक्सिजन, उपलब्ध मेडिसीन, उपलब्ध डॉक्टर यांचा 80 ते 90 टक्क्यांपर्यंत वापर होत आहे. त्यामुळे वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा वापर केला जातोय. जगातही साखळी तोडण्यासाठी वापर होतोय. म्हणून संपूर्ण मंत्रिमंडळाने ही भूमिका घेतली की, लॉकडाऊन लावून साखळी तोडावी लागेल. त्यामुळे अधिक कडक निर्बंध लावण्यात येतील. लॉकडाऊन करणं गरजेचं आहे. त्याची नियमावली जाहीर होईल. मुख्यमंत्री त्याची घोषणा करतील.

या लॉकडाऊनमध्ये रेल्वे, बस बंद राहणार नाही. जिल्हाबंदी नसेल, पण नियम कडक केले जातील. कुणालाही विनाकारण या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. ठोस कारण असल्याशिवाय दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. चौकशी केली जाईल, असं टोपे यांनी स्पष्ट केलं. राज्यांमध्ये आधी हजारांमध्ये बेड होते. ते आता लाखांमध्ये गेले आहेत. देशात कोणत्याही राज्यात चाचण्या करण्याच्या सुविधा नसतील इतक्या महाराष्ट्रात आहेत. अनेक चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत. ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

ऑक्सिजनविषयी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात एकूण 6 लाख 85 हजार रुग्ण आहेत. आपल्याला 15 टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन लागू शकतो. राज्य एकूण 1250 मेट्रिक टन उत्पादन करतं. 300 मेट्रिक टन हे केंद्राकडून मिळतं, म्हणजे, जामनगरमधून 200 मेट्रिक टन, भिलाईहून 110 मेट्रिक टन आपल्याला मिळायला हवं पण ते केवळ 60 मेट्रिक टन मिळणार आहे. भिल्लारीहून 200 मेट्रिक टन मिळणार आहे. तसेच आपण 500 मेट्रिक टन ऑक्सिजन आपल्याला मिळायला हवा अशी मागणी केलेली आहे. या तीन ठिकाणाहून कोटा वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भिलाईहुन 150 मेट्रिक टन मिळावा यासाठी मागणी केली आहे. तर जामनगरमध्ये 50 टन वाढवावा अशी अपेक्षा केली आहे. राज्यात 1550 मेट्रिक टन ऑक्सिजन ऑक्सिजन पुरेल अशी व्यवस्थी आहे. तसेच ऑक्सिजनचा पुरवठा राज्यभरात एफडीएच्या निर्देशांनुसार व्यवस्थित केला जात आहे. कोणत्याही प्रकारची पळवा-पळवी केली जात नाहीये, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.