नागपूर शहरातील रुग्ण संख्या एक लाख पार

Share This News

नागपूर
नागपूर शहर व ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. आजवर जिल्ह्यात सुमारे सव्वा लाखाहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी एकट्या नागपूर शहरातच एक लाखावरील बाधित आहेत. जेव्हाकी ग्रामीण भागामध्ये केवळ २५ हजारावरच रुग्णांची नोंद आजवर झाली आहेत. त्यातच आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र असल्याने प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
नागपूर जिल्ह्यात आजवर ९ लाख ५९ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी १ लाख २६ हजार १८९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह मिळून आलेत. यामध्ये आज पॉझिटिव्ह आढळलेल्या ४३४ रुग्णांचाही समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक चाचण्या या नागपूर शहरी भागातच करण्यात आल्यात. शहरी भागात आजवर तब्बल ७.२५ लाखाहून अधिक चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी १ लाखावर बाधित आढळून आलेत. आज बुधवारला ४९७0 चाचण्या झाल्यात. यामधून ३४४ शहरातून, ८७ ग्रामीणमधून तर ३ रुग्ण इतर जिल्ह्यातील आढळून आलेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) च्या विषाणू प्रयोगशाळेतून ७९ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. एम्समधून ७४, मेयोतून १२0, नीरीतून ३२, माफसूच्या प्रयोगशाळेतून ८, रॅपिड अँन्टिजेन तपासणीव्दारे २६, खासगी लॅबमधून ६९ व नागपूर विद्यापीठाच्या विषाणू प्रयोगशाळेतून ३२ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लख २६ हजार १८९ वर पोहचली आहे. यापैकी एकट्या नागपूर शहरातील रुग्णसंख्या १ लाख २४ इतकी आहे. तर ग्रामीणमधील २५,३६४ व इतर जिल्ह्यातील ८0१ जणांचा समावेश आहे. आज दिवसभरात ३0४ जण ठणठणीत होऊन घरी परतलेत. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या १ लाख १७ हजार ९४९ वर गेली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४७ टक्क्यांवर पोहचले आहे. आज शहरातील ३, ग्रामीणमधून २ व नागपूर जिल्ह्याबाहेरील ३ अशा ८ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनामृतांची संख्या ३९८४ वर पोहचली आहे. यापैकी ६१९ मृतक हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत.
२८७६ जण गृह विलगीकरणात
जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा वाढीस लागली आहे. आजघडीला शहरात ३१३१ व ग्रामीणमध्ये ११२५ असे ४२५६ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी २८७६ जणांना कुठलीही लक्षणे नसल्याने ते गृह विलगीकरणात आहेत. तर सौम्य, मध्यम व तीव्र लक्षणे असलेले १३८0 जण मेयो, मेडिकल, एम्ससह इतर शासकीय व खासगी रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.