४ जानेवारीला वाजणार शहरातील शाळांची घंटा
नागपूर : नागपूर शहरातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतचे वर्ग ४ जानेवारी २०२० पासून सुरू होत आहे. महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शाळा सुरू करण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी जारी केले. मात्र कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करून चाचणी केली जात आहे. अशा वातावरणात शाळा सुरू होणार असल्याने पालकांची चिंता कायम आहे. नागपूर शहरात इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी पर्यंत ५९३ शाळा आहेत. या शाळेचे ६२५२ शिक्षकांनी आर.टी.पी.सी.आर चाचणी (कोरोना चाचणी) केल्याबाबतचे प्रयोग शाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापन समितीकडे सादर करणे आवश्यक आहे.
शिक्षक व कर्मचाऱ्यांची थर्मल स्क्रीनिंग सर्व शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रोज थर्मल स्क्रीनींग केली जाईल तसेच शाळेच्या आवारात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशिवाय अन्य कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मास्क, पाण्याची बॉटल, शालेय साहित्य याची अदलाबदल करु नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना स्वत:शाळेत आणावे पालकांनी विद्यार्थ्यांना स्वत: त्यांच्या वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडण्याचे सांगितले आहे. स्वच्छतागृहात गर्दी होणार नाही, तसेच रोज निजंर्तुक करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आजारी मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये
पालकांचे संमतीपत्र लागणार सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळा सुरु करण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र घेण्याचे निर्देश दिले. सर्व शाळांना थर्मामीटर, थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर साबण इत्यादीची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.