आज पासून कोविशिल्ड लसीची दुसरी मात्रा
पहिल्या टप्प्यातील स्वयंसेवकांची प्रकृती उत्तम कोरोना या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोविशिल्ड लसीची क्लिनिकल ट्रायल भारतासह जगभरात सुरू आहे. भारतामध्ये ही ट्रायल १७ केंद्रांवर सुरू असून, त्यापैकी एक उपराजधानी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) आहे. मेडिकलमध्ये पहिल्या टप्प्यात ही लस सुमारे ५0 व्यक्तींना टोचण्यात आली. लशीचा कोणताही दुष्परिणाम नसून स्वयंसेवकांची प्रकृती उत्तम आहे. लस सुरक्षित असल्याने आता तिचा दुसरा टप्पा सोमवार २३ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. लशीची दुसरी मात्रा सुरू करताना स्वयंसेवकांच्या सर्व चाचण्या करण्यात येत आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विकसित करण्यात आलेल्या लशीची चाचणी यशस्वी झाली. पुण्यातील सिरम कंपनीच्या माध्यमातून कोविशिल्ड लस लवकरच उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे. या लसीची क्लिनिकल ट्रायल अंतिम टप्प्यात आहे. वैद्यकीय चाचणीनुसार ऑक्सफर्डची कोविशिल्ड लस टोचण्याला उद्या सोमवार, २३ नोव्हेंबरला २८ दिवस पूर्ण होतील. त्यामुळे दुसरी मात्रा, उद्यापासून देण्यात येणार आहे. मेडिकलमध्ये स्क्रिनिंग झाल्यावर १८ ते ५५ वयोगटातील एकही समस्या नसलेल्या व आरोग्याच्या दृष्टीने निरोगी असलेल्या पहिल्या १५ स्वयंसेवकांना २३ आणि २४ ऑक्टोबरला ही लस देण्यात आली होती. त्यानंतर इतर ३५ स्वयंसेवकांना ही लस दिली. लस देण्यापूर्वी संबंधित स्वयंसेवकांच्या कोरोनासह इतरही तपासणी घेत त्यांचा मधुमेह, उच्च रक्तदाबासह इतरही इतिहास घेण्यात आला. त्यानंतर एकही आजार व गुंतागूंत नसलेल्या स्वयंसेवकांना ही लस दिली. पहिल्या टप्प्यात लस टोचल्यानंतर सर्व स्वयंसेवकांना डॉक्टरच्या निरीक्षणात ठेवण्यात आले. कोणालाही दुष्परिणाम दिसला नाही. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. लसीची दुसरी मात्रा सुरू करताना स्वयंसेवकांच्या सर्व चाचण्या करण्यात येतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे. |