राज्य सरकारकडून कोरोना काळातही जनतेला त्रास

Share This News

मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केले तेच समजले नाही
शुक्रवारला मुख्यमंत्र्यांनी कशासाठी भाषण केले हेच समजले नाही, त्यांनी भाषणात कोरोना वाढण्याची कारणे सांगितली नाही की, उपाययोजना सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केले? तेच समजले नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. राज्यात अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नाही. ते का मिळत नाहीत, त्यावर काय करणार आहोत, उपाययोजना काय, व्यवस्था का नाही, याचे उत्तर द्यायला हवे होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, सल्ला देतात त्यांना उत्तर दे यातच वेळ घालवला, या शब्दांत फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला.लोकशाही वार्ता / नागपूर
कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने २0 लाख कोटींचे पॅकेज गेल्या वर्षभरात दिले. देशातील अन्य राज्यांनीही जनतेसाठी पॅकेज दिले. केवळ महाराष्ट्राने एक पैशांचेही पॅकेज दिले नाही. मात्र, त्याऐवजी लोकांचे वीज कनेक्शन कापणे, लोकांना त्रास देणे यावरच भर दिला, अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारच्या कारभारावर केली आहे.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊन होणार का, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री राज्यातील जनतेला संबोधित केले.आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला असून, ते म्हणाले की, संपूर्ण कोरोनाच्या संकट काळात देशातील विविध राज्यांनी आपल्या जनतेसाठी पॅकेज घोषित केले. परंतु जर कोणते राज्य आपल्याच जनतेला त्रास देत असेल, तर ते महाराष्ट्र आहे, असा घणाघातही फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री लॉकडाऊनसाठी दिलेल्या अल्टिमेटमवरही फडणवीस यांनी टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणतात दोन दिवसांत बघा. काय दोन दिवसांत बघायचंय, अशी खिल्ली उडवत लॉकडाऊन अपवादात्मक परिस्थितीत करावे लागते. तो अपवाद आहे, नियम होऊ शकत नाही. लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करताना देशातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारे अन्नधान्य, खात्यावर जाणारे पैसे, अन्य सुविधा यांचाही विचार केला होता. मुख्यमंत्र्यांनीही तेच करायला हवे. केवळ जगभरातील देशात कोरोना कसा वाढतो हे सांगून चालणार नाही, असे फडणवीस यावेळी म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.