एका गावाची गोष्ट

Share This News

भारतात सध्या ‘४-जी’ चा जमाना आहे
पण या ‘४-जी’ च्या काळातही
भारतात असं एक गाव आहे, जिकडे आजही
फक्त पी.सी.ओ.ने संवाद साधला जाऊ शकतो.

आजही ३ रुपये/ मिनिट या दराने
फोन लावावा लागतो.
जे मोबाईल २-जी, ४-जी वगैरे सोयींपासून
कोसो लांब आहे.

जिकडे एका मिठाच्या पॅकेटची किंमत
२५० रुपये आहे.
एक किलो साखरेसाठी २०० रुपये मोजावे लागतात,
तर एक सिमेंटची गोणी
तब्बल ७००० रुपयांना मिळते.

या गावात एकच  सरकारी शाळा आहे,
जिकडे शिक्षक येणं, हेच मुलांसाठी मोठी गोष्ट असते
आणि १०वीची परीक्षा देण्यासाठी तब्बल
९ दिवस ट्रेक करून डोंगर पार करावे लागतात.
तेव्हा कुठे विद्यार्थी परिक्षेच्या ठिकाणी पोहचू शकतो.

या गावातल्या लोकांना एखादं वाहन अथवा
चित्रपटगृह किंवा ट्युबलाईट बघण्यासाठी
१५० किलोमीटरचं अंतर कापावं लागते.

आज २०२० मध्ये सगळ्या सुविधा
आपल्या पायाशी उभ्या आहेत, तर तिकडे
साधारण आयुष्य जगण्यासाठी
भारतातल्या एका गावाला संघर्ष करावा लागतो आहे.

या गावात राहणाऱ्या लोकांनी
त्याची निवड नाही केली, 
तर ते स्वीकारलं आहे,
*भारतीय सीमांच्या रक्षणासाठी!*

वाचून आश्चर्य वाटेल,
पण या गावात राहणाऱ्या २०० कुटुंबियांनी
इकडे स्थलांतर केलं ते भारत सरकारच्या आदेशावरून.

२७ नोव्हेंबर १९६१ ला इकडे
भारतीय सेनेने तिरंगा फडकवला होता
आणि त्या दिवसापासून ते आजतागायत
हे गाव भारताचा अविभाज्य अंग आहे,
ते त्या २०० कुटुंबियांमुळे
ज्यांनी सगळ्या विपरित परिस्थितीत
या भागात आपलं आयुष्य काढलं.

१९६१च्या काळात जेव्हा
भारतीय सेनेच्या आसाम रायफल्सने
भारताच्या अतिपूर्वेकडील प्रदेशावर
आपली मोहीम फत्ते केली, तेव्हा आसाम रायफल्सचे
माजी अधिकारी मेजर जनरल *ए. एस. गौर्या*
ह्यांना एक असा प्रदेश दृष्टीक्षेपात आला ज्याचं महत्त्व
भारताच्या सीमेच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं.

या प्रदेशात फक्त जंगल होतं,
इथे कोणतीही मनुष्यवस्ती नव्हती.
या भूभागाच्या तिन्ही बाजूने भारताला
एका देशाने वेढलेलं होतं
तो म्हणजे *म्यानमार*
_(पूर्वीचा ब्रह्मदेश किंवा बर्मा)._

भारताचा हा प्रदेश जर सुरक्षित ठेवायचा असेल
आणि हा भारताचा भूभाग आहे
हे जागतिक मंचावर सिद्ध करायचं असेल,
तर तिकडे भारतीय लोकांची वस्ती दाखवणं
हे अतिशय गरजेचं होतं.

मेजर जनरल ए. एस. गौर्या यांनी
भविष्यातला धोका ओळखताना अतिशय चातुर्याने
एक पाऊल उचललं ज्याचा फायदा
भारताला आजतागायत होतो आहे.

भारताच्या आसाम रायफल्सच्या
२०० सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना
मेजर जनरल ए. एस. गौर्या यांनी
इकडे वस्ती करण्यासाठी आदेश दिला.
या नवीन वस्तीचं नाव त्यांनी आपल्या
मुलाच्या *‘विजय’* या नावावरून ठेवताना
भारताच्या नकाशावर
एका नवीन गावाचा उदय झाला…

*‘विजयनगर’.*

भारताच्या अरुणाचल प्रदेश मध्ये
*विजयनगर* वसलेलं आहे.
निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं हे गाव
भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे.

या गावात रस्ते नाहीत, 
जवळचं गाव हे म्यानमार मधील *पुटाओ,*
हे ४० किलोमीटरवर आहे,
तर भारतातील रस्ते असलेलं *मिओ*
हे जिल्ह्याचं ठिकाण इथून
१५७ किलोमीटर लांब आहे.

विजयनगरला जायचं असेल तर एकमेव पर्याय
म्हणजे भारतीय हवाई दल.
रस्ते नसलेल्या या गावात
भारतीय वायुदलाची धावपट्टी आहे.
Advanced Landing Ground (ALG)
ही इकडे येण्याचा एकमेव मार्ग आहे.

इकडे येणारं प्रत्येक सामान हे भारतीय वायु दलाच्या
हेलिकॉप्टर किंवा कुलीन मार्फत आणलं जातं.

९ दिवसांचं ट्रेकिंग केल्याशिवाय
इकडे येण्याचा मार्ग नाही,
म्हणून इकडे येणाऱ्या प्रत्येक वस्तूची किंमत
ही जवळपास ३ ते ४ पट आहे.
इकडे राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला
याच दिव्यातून पुढे जावं लागत आहे.

समुद्रसपाटीपासून जवळपास ५००० फूट उंचीवर
वसलेलं *विजयनगर* हे भारताचं अविभाज्य अंग आहे.
पण आज त्या अंगाला भारताशी
नाळेप्रमाणे जोडून ठेवणारी ती २०० कुटुंबं
आणि त्यांच्या पिढ्या आजही
सर्वसामान्य सुविधांपासून वंचित आहेत.

आज भारताच्या स्वातंत्र्याला ७३ वर्षे झाली,
या ७३ वर्षांत अनेक सरकारं बदलली
पण विजयनगर मात्र आजही त्याच
सुविधांच्या अपेक्षेत आस धरून बसलं आहे.

इथल्या लोकांकडे भारतीय पासपोर्ट आहे.
भारतीय नागरिकत्व आहे.
त्याच जोरावर आज तिन्ही बाजूने
म्यानमारने वेढलेला भाग
भारताचं अस्तित्व राखून आहे
पण अश्या अतिशय महत्वाच्या प्रदेशाकडे
गेल्या ७० वर्षांत ना कोणत्या राज्यकर्त्याचे लक्ष गेले, 
ना इकडे काही विकास झाला.

भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर
इकडे बदललेल्या वाऱ्यांचं अस्तित्व
जाणवायला लागलं आहे.
भारताने गेल्या काही वर्षात
आपल्या अतिपूर्वेकडील राज्यांकडे लक्ष द्यायला
सुरवात केली आहे.
इकडे दळवळणाच्या सुविधा वाढवण्यासाठी
महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत.
त्यातील एक म्हणजे-
*Arunachal Pradesh Frontier Highway.*

जवळपास २००० किलोमीटर लांब आणि
४०,००० कोटी रुपये किंमत असलेला हा रस्ता,
अरुणाचल प्रदेश सोबत विजयनगर इथल्या लोकांच्या
अंधारमय आयुष्यात एक सोनेरी पहाट बनेल
अशी आशा इथले लोक बाळगून आहेत.

विजयनगरवर निसर्गाने
मुक्त हस्ताने उधळण केली आहे.
*‘नाम्दफा नॅशनल पार्क’ला* खेटून
विजयनगर वसलेलं आहे.
*‘नाम्दफा नॅशनल पार्क’* हे १,९८५ चौ. किमी
म्हणजे सुमारे ७६६ चौ. मैलाचा भूभाग व्यापलेले
पूर्वोत्तरच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील
प्रतिबंधित क्षेत्र आहे.
त्यामुळे जर रस्ता झाला,  तर पर्यटनाच्या दृष्टीने
विजयनगर जागतिक पटलावर
आपलं नाव उमटवू शकेल.
रोजगाराच्या अनेक संधी सैनिकांच्या कुटुंबियांना
उपलब्ध होतील.

भारताच्या सीमांच्या रक्षणासाठी
आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांना जंगलात नेऊन
तब्बल ६० वर्षापेक्षा जास्त काळ वनवास जगणाऱ्या
विजयनगरच्या

*त्या ४४३८ भारतीय लोकांना*
*साष्टांग नमस्कार!*


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.