केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पांतर्गत विदर्भातील वैनगंगा- नळगंगा हा प्रकल्प मंजूर
नागपूर – केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पांतर्गत विदर्भातील वैनगंगा- नळगंगा हा प्रकल्प मंजूर झाला आहे. पूर्व विदर्भातील गोदावरी- वैनगंगेच्या खोऱ्यातून अतिरिक्त पाणी घेऊन ते पश्चिम विदर्भातील तापी- पूर्णाच्या खोऱ्यात वळविण्याचा हा प्रकल्प आहे. अर्थात, पूर्वेचे पाणी पश्चिमेचा ४२६ किलोमीटरचा प्रवास करून विदर्भातील शेतकऱ्यांची हिरवी स्वप्ने साकारणार आहे. प्रकल्पाचा डीपीआर तीन वर्षांपासून तयार असून, आता केंद्र आणि राज्याकडून मिळणाऱ्या निधीची प्रतीक्षा आहे. केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय जल मंत्रालयाने १९८० मध्ये देशात नदीजोड प्रकल्प आखला. त्यानंतर १७ जुलै १९८२ मध्ये प्रकल्पाच्या अभ्यासासाठी राष्ट्रीय जल विकास अभिकरणाची स्थापना केली. पुढे २००९ मध्ये राज्य सरकारने राज्यातील तीन नदीजोड प्रकल्पांचे प्रस्ताव अभिकरणाकडे पाठविले. त्यापैकी विदर्भातील वैनगंगा- नळगंगा हा प्रकल्प मान्य करण्यात आला.
चार प्रकल्प जुळणार प्रकल्पात पूर्व आणि पश्चिम विदर्भातील चार प्रकल्प एकमेकांशी जोडले जाणार आहेत. या प्रवासात वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा प्रकल्प (आर्वी), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प (बार्शिटाकळी) आणि बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा (मोताळा) प्रकल्पात पाणी पोहोचणार आहे. या मार्गामध्ये येणाऱ्या सहा जिल्ह्यांतील १५ तालुक्यांमध्ये ३५ तलाव खोदले जाणार असून, चार तलावांची क्षमता वाढविली जाणार आहे. हे पाणी या ३९ तलावांमध्ये साठवले जाणार आहे. या तलावांतून २,८७८ हेक्टर कृषिक्षेत्राला लाभ मिळणे प्रस्तावित आहे.