पोलिसांकडून लुटलेली शस्त्रे अबुजमाडमध्ये नक्षल्यांनी पोलिसांवर वापरली|The weapons looted by the police were used by the Naxals against the police in Abujamad

Share This News

नागपूर : महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या अबुजमाडमधील नक्षलवाद्यांचा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त करण्यासाठी गेलेल्या गडचिरोली पोलिस दलाच्या सी-६० कमांडो पथकांवर गोळीबार करण्यासाठी नक्षल्यांनी पोलिसांकडून एकेकाळी लुटलेली अत्याधुनिक शस्त्रे वापरल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
अबुजमाडच्या घनदाट व दुर्गम जंगलात सतत ४८ तास खास ऑपरेशन राबवित गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडो पथकांनी शुक्रवार, ५ मार्चला नक्षलवाद्यांचा सर्वांत मोठा शस्त्र कारखाना जमीनदोस्त केला. या चकमकीतून परतलेल्या पथकाने चकमकीच्या ठिकाणावरून संकलित केलेली माहिती गडचिरोली परीक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील व गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्याशी ‘शेअर’ केली. चकमकीबद्दल मिळालेली ‘ऑन द स्पॉट’ माहिती ‘शंखनाद’ने घटनेनंतर लगेच दिली. शनिवार, ६ मार्चलाही ‘शंखनाद’ने पोलिस-नक्षल चकमकीच्या या खास ‘ऑपरेशन’चा आणखी सखोल माग काढला. त्यावेळी धक्कादायक बाबी पुढे आल्या.

२०२१ मधील सर्वांत मोठे यश
देशातील अनेक राज्यात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची मोहिम सुरू आहे. त्यातील अबुजमाडमध्ये शुक्रवारी झालेली कारवाई यावर्षातील देशातील सर्वांत मोठे यशस्वी ‘ऑपरेशन’ ठरले आहे. जंगलाती दगडधोंडे, काटे तुडवित कमांडो पथके सतत पायी चालत जेव्हा अबुजमाडच्या ‘त्या’ कारखाना व कॅम्पपर्यंत पोहोचले त्यावेळी नक्षलवादी उंच झाडे आणि डोंगरांवर दबा धरून बसले होते. त्यांनी १०० मीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या शस्त्रास्त्रातून कमांडो पथकांवर फायरींग केले. प्रचंड फायरींगची क्षमता असलेल्या ‘टू इंच मोर्टार गन’ही नक्षलवाद्यांकडे होत्या. नक्षलवाद्यांकडे ही अत्याधुनिक शस्त्रे पाहून कमांडो पथकेही आश्चर्यचकित झाली. चारही बाजूने घनदाट जंगल व आजूबाजूला पाचशे ते सहाशे मीटर उंच पहाडे अशा ठिकाणी इंद्रावती नदीपासून काही अंतरावर हा कॅम्प व शस्त्र कारखाना होता. इंद्रावतीपासून काही अंतरावरच छत्तीसगड राज्याची सीमा होती. त्यामुळे पोलिसांवर हल्ला करायचा. त्यानंतर छत्तीसगडच्या सीमेत पळून जायचे. थोडा वेळाने पुन्हा जास्त संख्येत येत पोलिसांवर हल्ला करायचा, असा प्रकार नक्षलवाद्यांनी चालविला होता.

टू इंच मोर्टार गन कशी असते?
‘टू इंच मोर्टार गन’ या शस्त्राची निर्मिती दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्यावेळी युनायटेड किंगडममध्ये (यूके) करण्यात आली होती. १९३७ मध्ये त्याचे मूळ डिझाइन तयार झाले. त्यानंतर त्यात बदल होत गेले. सध्या भारतात असलेल्या मोर्टार गनमधुन एका मिनिटात ८ राऊंड फायर करता येतात. ४६० मीटरपर्यंतचे लक्ष्य खाक करण्याचे सामर्थ्य या मोर्टार गनमध्ये आहे. या शस्त्रात उच्च स्फोट क्षमता असलेले बॉम्बगोळे वापरण्यात येतात.

‘ही’ शस्त्रे तयार होत होती कारखान्यात
गडचिरोली कमांडो पथकांची जमिनदोस्त केलेल्या नक्षली कारखान्यात काही खास शस्त्र तयार करण्यात येत होती. त्यातील दहापेक्षा जास्त भरमार बंदुकी पथकांच्या हाती लागल्या. या बंदुकीमध्ये एक बार भरायचा, तो फायर करायचा, पुन्हा दुसरा भरायचा अशा पद्धतीने फायरींग केले जाते. स्वस्तात व सहज मिळाणाऱ्या साहित्यातून या बंदुकी तयार करता येतात.

चक्क ग्रेनेड लाँचर सापडले
उच्चस्तरावरील सुरक्षा एजन्सी ग्रेनेड लाँचर वापरतात. अबुजमाडमधील कारखान्यात नक्षली बॅरेल ग्रेनेड लाँचर बनवित होते. २०१०मध्ये भारतीय सैन्याने या लाँचरचा वापर सुरू केला. दीड किलो वजनाचे हे शस्त्र असते. ४५० मिलिमीटर लांबी व ३५० मिलिमीटर बॅरेल लांबी असलेल्या या शस्त्रातून एका मिनिटाला ७ राऊंड फायर करता येतात. ४०० मीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता या शस्त्रात आहे. या शस्त्रात ४० x ४६ मिलिमीटरचे ग्रेनेड वापरण्यात येतात.

धातक स्फोटकांचाही समावेश
अबुजमाडच्या कारखान्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात तयार करण्यात येत होते ते कुकर बॉम्ब व भूसुरूंग. इंप्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस (IED) पद्धतीने हे कुकर बॉम्ब तयार करण्यात येत होते. २००६मध्ये सर्वप्रथम मुंबईतील रेल्वे स्फोटांमध्ये या बॉम्बचा वापर दहशतवाद्यांनी केला होता. त्यानंतर कुकर बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण नक्षल्यांपर्यंत पोहोचले. या बॉम्बसाठी लागणारे साहित्य बाजारात सहज मिळते. त्यामुळे नक्षलवादी असे अनेक बॉम्ब तयार करीत होते.

एवढी शस्त्रास्त्रे आली कशी?
नक्षलवाद्यांनी वेळोवेळी देशभरात विविध ठिकाणी सुरक्षा बलांवर हल्ले करून लुटलेली शस्त्रास्त्रे अबुजमाडमध्ये गोळा केल्याचे प्राथमिक तपासातून पुढे येत आहे. यात केंद्रीय रिझर्व पोलिस दल, इंडो-तिबेट बॉर्डर फोर्स, छत्तीसगड नक्षल विरोधी फोर्स, गडचिरोली पोलिस आदी अनेक सुरक्षा दलांचा समावेश आहे. आता गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडो पथकांनी हा कारखानाच उद्ध्वस्त केल्याने नक्षलवाद्यांना पुरविण्यात येणारी रसद खंडीत होणार आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.