पहिल्यांदाच होणार महिलेला फाशी
मथुरा : स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशात एका महिलेला फाशी देण्यात येणार आहे. शबनम अली (वय ३८) हे तिचे नाव आहे. कुटुंबातील सात जणांच्या हत्याप्रकरणात तिला फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. मथुरा जिल्हा तुरुंगात तिच्या फाशीची तयारी पूर्ण झाली आहे.
महिलांना फाशी देण्याची व्यवस्था फक्त मथुरा येथील तुरुंगातच उपलब्ध आहे. १८७० मध्ये येथे फाशीचा वधस्तंभ तयार करण्यात आला होता. मात्र येथे आतापर्यंत एकाही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही. निर्भया हत्याकांडातील दोषींच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करणारा पवन जल्लाद हाच शबनमच्या शिक्षेची अंमलबजावणी करणार आहे.
कोण आहे शबनम?
अमरोहा येथील रहिवासी शबनमने प्रेमी सलीमसोबत १५ एप्रिल २००८ मध्ये स्वत:च्याच कुटुंबातील सात जणांची हत्या केली होती. त्यात आई-वडील, दोन भाऊ, वहिनी, मावशीची मुलगी, दहा महिन्यांचा भाचा यांचा समावेश होता. शबनम आणि तिच्या प्रियकराला हत्येच्या आरोपात दोषी ठरविण्याच्या निर्णयाला तिने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता. राष्ट्रपतींनी त्यांची दयेची याचिकाही फेटाळली होती. घटनेनंतर १३ वर्षांनंतर आता फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.