जागतिक आरोग्य संघटनेची चमू लवकरच चीनला जाणार
कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले असून एकूण कोरोना बाधितांचा आकडा ५.९५ कोटींवर पोहोचला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अनेक महिने टाळाटाळ केल्यानंतर आता तज्ज्ञांची एक चमू चीनमध्ये पाठविण्याचा विचार केला जात आहे. ही चमू तिथे कोरोना व्हायरस कशामुळे आणि कसा पसरला? याचा तपास करणार आहे. दुसरीकडे अमेरिकेत गेल्या एका आठवड्यात कोरोनामुळे मरणारांचा आकडा १0 हजारच्याही पुढे गेला आहे. जगातील आरोग्य तज्ज्ञ आणि संक्रमक आजारांच्या तज्जञांची एक टीम चीनमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सोमवारी रात्री सांगितले. चीनमध्ये व्हायरस कसा पसरला? या व्हायरसचा मुख्य सोर्स काय होता? हा आजार कुण्या प्राण्यापासून मानवात पसरला, की आणखी काही कारण आहे? यासंदर्भात ही टीम तपास करणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. चीन सरकार या टीमला पूर्ण सुविधा पुरवणार असल्याचा विश्वास आम्हाला असल्याचे संघटनेचे इमरजन्सी डायरेक्टर मायकल रायन यांनी सांगितले. या टीममध्ये चीनच्या तज्ज्ञांचाही समावेश असेल. तत्पूर्वी, कोरोना व्हायरस हा चीनमधील लॅबमधूनच पसरला. वेळ आली, की आपण हे आरोपही सिद्ध करू.असा आरोप अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर सातत्याने केले आहेत. मात्र त्यांना अद्यापही कसल्याही प्रकारचे पुरावे देता आलेले नहीत. तर संघटनेने म्हटले आहे, या व्हायरसने एवढे विक्राळ रूप कसे धारण केले, हे जगाला माहीत होणे आवश्यक आहे. |