मुंबईत हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचे १४ प्लांट होताहेत सज्ज

Share This News

मुंबई: ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसविण्यात येणार आहेत. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्लांट कार्यान्वित होतील, असे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून रुग्णांना पुरविणाऱ्या प्लांटची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
हवेतून ऑक्सिजन शोषून त्यातून शुद्ध ऑक्सिजन रुग्णांना पुरविण्यात येतो. साधारणता एका प्लांटमधून दररोज सुमारे २ टन (९६० एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे २०० ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले.
गडचिरोलीतही…
सध्याच्या परिस्थितीत आणि भविष्यातही ऑक्सिजनची गरज भासल्यास या प्लांटमधून निर्माण होणारा ऑक्सिजन त्यासाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले. याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातही दिवसाला एक ते दीड टन ऑक्सिजन निर्मिती करणारे पाच ते सहा प्लांट उभारण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.