अमरावती, यवतमाळात घातक कोरोना नाही
पुण्यात राज्यातील पहिली जिनोम सिक्वेन्सिंग लॅब
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे पाहता राज्यातील पहिली जनुकीय रचना तपासणारी जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा पुण्यातील ससून रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. विदर्भातील अमरावती, यवतमाळसह पुणे, सातारा या चार जिल्ह्यातील संशयित नमुने येथे तपासण्यात आलेत. त्यानंतर या नमुन्यांमध्ये ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका येथील नवीन घातक विषाणूंचा प्रकार (स्ट्रेन) आढळून आला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अमरावती व यवतमाळ येथील कोरोना रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेतील घातक प्रकार आढळल्याचे वृत्त गुरुवारी सर्वत्र पसरले होते. प्रसार माध्यमात या बातम्या आल्यानंतर आरोग्य विभागाने शुक्रवारी यावर स्पष्टीकरण दिले. राज्यात अद्याप कुठेही परदेशातील जनुकीय रचना बदललेले स्ट्रेन आढळले नसल्याचे बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, उपअधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी पत्रकारांना सांगितले. एकूण २४ नमुन्यांचे ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ पुण्यात करण्यात आले. त्यातून हा ठाम निष्कर्ष हाती आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ससून रुग्णालयात ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ करण्यासाठी रुग्णालयातील तीन सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांना बेंगळुरू येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. त्यांनी त्या ठिकाणी राज्यातील चार नमुन्यांचे ‘सिक्वेसिंग’ करून पाहिले. ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ तपासणीत कोरोनाचा भारतीय प्रकार असलेल्या ‘क्लेड ए-२’ विषाणूचा प्रकार आढळला आहे. ‘क्लेड ए २’ या प्रकारच्या विषाणूत ‘डी-६१४ जी’ या प्रकारचे म्युटेशन आढळले आहे. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी काही दिवसांपूर्वी चार जिल्ह्यांतील नमुन्यांचे ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही तपासणी करण्यात आल्याचे दोन्ही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.