जळगावच्या वसतिगृहातील घटनेत तथ्य नाही : गृहमंत्री There is no fact in the incident in Jalgaon hostel: Home Minister

Share This News

मुंबई : जळगाव येथील आशादीप शासकीय वसतिगृहात महिलांना कपडे काढून नृत्य करायला लावण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही. विविध खात्याच्या सहा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत हे स्पष्ट झाल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

जळगाव येथील आशादीप शासकीय वसतिगृहात महिलांना कपडे काढून नृत्य करायला लावल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत विधिमंडळातही चर्चा झाली होती. याबाबत देशमुख म्हणाले, केवळ पोलिसच नव्हे तर सहा विविध खात्याच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी केली आहे. त्यामध्ये असा कोणताही प्रकार घडलेला नाही, असा अहवाल त्यांनी दिला आहे.
देशमुख म्हणाले, महिला अधिकाऱ्यांनी वसतिगृहाला भेट देऊन सर्व कामकाज पाहिले. महिलांशी चर्चा केली. येथील ४१ जणांकडून माहिती घेतली. त्याप्रमाणे या सहा महिला अधिकाऱ्यांच्या समितीने अहवाल दिलेला आहे. तक्रारीमध्ये काहीही तथ्य आढळलेले नाही, असे त्यांनी सांगितले आहे. २० फेब्रुवारीला महिलांनी मनोरंजनाचा कार्यक्रम केला होता. त्यात गरबा, कविता वाचन, गाण्याचा कार्यक्रम होता. गरबा डान्स करताना एका महिलेने त्रास व्हायला लागला म्हणून ड्रेस काढून ठेवला होता. याठिकाणी फक्त महिला होत्या. हे महिलांचे वसतिगृह असल्याने एकही पोलिस कर्मचारी तिथे आत जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये कोणी अधिकारी कधी आतमध्ये आल्याची नोंद नाही. त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडीओ झाला, विवस्त्र व्हायला लावले आणि पोलिसांनी व्हिडीओ काढला यामध्ये काही तथ्य नाही. तक्रारकर्त्या महिलेच्या वेडसरपणाबद्दल अनेक तक्रारी आहेत, काही तक्रारी त्यांच्या कुटुंबीयांकडूनही दिल्या गेलेल्या आहेत. ती मारहाण करते, शिव्या देते अशा प्रकारच्या तक्रारी दाखल आहेत, असे गृहमंत्री म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.