राज्यातील हे सरकार म्हणजे भ्रष्टाचाराची गटारगंगा – फडणवीसांचा सरकारवर घणाघात
राज्यातील हे सरकार म्हणजे भ्रष्टाचाराची गटारगंगा असल्याचा घणाघात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. विविध मागण्यासाठी भंडाऱ्यात आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चात भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे,प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे,विधानपरिषद आमदार परिणय फुके यांच्यासह भाजपचे नेते व कार्यकारते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सरकारने अनेक योजनांना स्थगिती दिली. केवळ एकच योजना सुरू आहे, ती म्हणजे भ्रष्टाचार अशी जोरदार टीका देवेंद्र फडणवीस यांनी भाषणादरम्यान केली. ते म्हणाले कि पूर्व विदर्भाच्या 6 जिल्ह्यांतील शेतकर्यांना या सरकारने एकूण 11 कोटी रूपये दिले. आज कित्येक शेतकरी अर्ज करून हैराण आहेत, पण त्यांना कोणतीही मदत मिळत नाही. हे बांधावर जाऊन आश्वासने देणारे आज शेतकर्यांना कवडीची मदत करीत नाही.आमच्या सरकारच्या काळात दुधाला अनुदान दिले गेले. पण, आज दुधाचे पैसेच दिले जात नाही.
वीजबिल माफीची घोषणा तर सरकारच्या मंत्र्यांनीच केली. पण, आज ते घूमजाव करतात. गरिबांना देण्यासाठी 1200 कोटी नाहीत आणि मुंबईच्या बिल्डरांना 5000 कोटींची सवलत दिल्याचा आरोप फडणवीसांनी यावेळी केला. वीजेचे कनेक्शन कापण्यासाठी गावात कुणी आले तर त्याला एक गुलाबाचे फूल द्या आणि त्यांना गाडीत बसवून परत पाठवा.कुणाचीही वीज कापण्याची सक्ती कुणाला करू देणार नाही, ही जबाबदारी भाजपाच्या कार्यकर्त्यांची असल्याचे फडणवीस म्हणाले. 10 बालकांच्या मातांचे अश्रू अजूनही सुकले नाहीत.
भंडार्यातून घालवता आणि वर्ध्यात रूजू करून घेता, हीच का तुमची संवेदनशीलता? असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला. 6 महिने मंत्रालयात फाईलवर बसून राहिले नसते, तर आज ही वेळ आली नसती. हा अपघात नाही, राज्य सरकारच्या चुकीमुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.