यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीत व्हावे – ‘सरहद’चे अध्यक्ष संजय नहार | This year’s All India Marathi Sahitya Sammelan should be held in Delhi
पुणे 31 डिसेंबर (हिं.स) यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीत व्हावे, यासाठी पुण्यातील सरहद संस्थेने पुढाकार घेत, तसे निमंत्रण साहित्य महामंडळाला दिले होते. दरम्यान, यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.कोरोना तसेच सध्याच्या लस येण्याच्या पार्श्वभूमीवर 31 मार्चपूर्वी संमेलन आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे असले तरी सरहद संस्थेने दिल्ली येथे या साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबतचे निमंत्रण माघारी घेतलेले नाही किंवा रद्द देखील केले नाही, असे सरहद संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तरी या निमंत्रणाचा पुन्हा विचार करावा, असे ‘सरहद’चे अध्यक्ष संजय नहार यांनी म्हटले आहे. लसीकरणाद्वारे एप्रिलपर्यंत कोरोनाचे संकट आटोक्यात येणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल असल्याने शनिवारी 1 मे 2021 या महाराष्ट्र दिनाच्या दिवसापासून दिल्लीत तीन दिवसांचे संमेलन घेण्याची तयारी आहे, असे नहार यांनी सांगितले. 31 मार्च पूर्वीच संमेलन झाले पाहिजे, असे काही सदस्यांचे म्हणणे आहे. मात्र, पंजाबमधील घुमान येथे तीन चार पाच एप्रिल 2015 ला संमेलन झाले होते. विशेष बाब म्हणून एक-दोन-तीन मे 2021 या तारखांना यासाठी उपयुक्त ठरू शकतात, असे देखील नहार यांनी सुचवले आहे. दरम्यान, नहार यांच्या या प्रस्तावावर महामंडळ विचार करणार का? हे पहावे लागेल.
This year’s All India Marathi Sahitya Sammelan should be held in Delhi – Sanjay Nahar, President of ‘Sarhad’