‘त्या’अधिकाऱ्यांनी मग रश्मी शुक्लांविरोधात न्यायालयात जावे – जितेंद्र आव्हाड

Share This News

मुंबई – राज्यातील राजकीय वातावरण विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेल्या पोलीस बदली रॅकेट प्रकरणावरून चांगलेच तापले आहे. यासाठी आपल्याकडे अनेक अधिकाऱ्यांचे फोन टॅपिंगचे पुरावे असल्याचा देखील फडणवीस यांनी दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून जिथे सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले जात आहे, तिथेच दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून देखील परवानगीशिवाय फोन टॅपिंग या मुद्द्यावरून विरोधकांवर निशाणा साधायला सुरूवात केली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याच आधारावर फोन टॅपिंगवरून भाजप आणि वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर परखड टीका केली आहे.

रश्मी शुक्ला यांच्यावर आपल्या ट्विटमध्ये आव्हाडांनी थेट निशाणा साधला आहे. रश्मी शुक्ला यांच्या अहवालाने त्याच फक्त एक सरळ आणि स्वच्छ अधिकारी आहेत आणि बाकीचे सर्वच भ्रष्ट आहेत. हा सरळ सरळ केलेला पोलीस खात्याचा अपमान आहे. शुक्ला यांनी नाव घेतलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी सरकारचा सल्ला घेऊन त्यांच्याविरोधात न्यायालयात जावे, असे आव्हाड म्हटले आहे.

पोलीस अधिकारी आहेत म्हणून कुणीही नागरिकांचा फोन टॅप कसा करू शकेल? त्याकरिता त्यांचे कोणतेही नियम वा कायदे नाहीत? या प्रकरणात असे दिसते की अधिकाऱ्यांना वाटले की ते काहीही करू शकतात. याची खात्री कोण देईल, की अजून किती जणांचे फोन टॅपिंगला लावले होते?, असे देखील आव्हाड ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, त्यांनी या मुद्द्यावर पत्रकारांशी बोलताना सविस्तर भूमिका मांडली आहे. फोन टॅप करायचा असेल तर गृहखात्याच्या अतिरिक्त सचिवांची परवानगी लागते. अशी परवानगी रश्मी शुक्लांनी घेतली नसल्याचे सीताराम कुंटेंनी सांगितले आहे. फोन टॅपिंगची वाईट सवय शुक्लांना होती हे पूर्वीच्या सरकारच्या काळात देखील आरोप झाले आहेत. त्यांनी लिहिलेले पत्र जेव्हा उघड झाले, तेव्हा त्यांनी माफी मागितली. आत्ताच्या फोन टॅपिंगबद्दल माफी मागितली. सरकारने दयाळू होऊन सौम्य भूमिका घेतली. तेच पत्र वापरून महाराष्ट्र सरकारची बदनामी केली जात असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

फोन टॅपिंग हा गुन्हा आहे. फोन टॅपिंगचे काही नियम केद्र सरकारने दिले आहेत. राष्ट्रघातक कृत्य, अतिरेकी संघटनेशी मैत्री याशिवाय तुम्ही फोन टॅपिंग करू शकत नाही. एखादा माणूस येथील शांततेचा भंग करू शकतो, असे वाटले, तर तुम्ही फोन टॅप करू शकतात. म्हणजे रश्मी शुक्लांची कारणे संयुक्तिक नव्हती. परवानग्या देखील चुकीच्या घेतल्या. आम्हाला दाट शंका आहे की अनेक मंत्र्यांचे देखील फोन टॅप केले गेल्याचा आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

रश्मी शुक्ला यांनी राज्य सरकारला मूर्ख बनवत अ व्यक्तीच्या टॅपिंगची परवानगी घेऊन ब व्यक्तीचा फोन टॅप केला हे अत्यंत भयंकर आहे आणि या रिपोर्टच्या माध्यमातून महाविकासआघाडीची बदनामी करण्याचे हे एक नियोजनबद्ध कारस्थान असल्याचा आरोप देखील आव्हाडांनी केला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.