आष्टी परिसरात आढळला वाघाचा मृतदेह

Share This News

वर्धा,दि.25-आष्टी वनपरिक्षेत्रातील साहूर गावानजिक असलेल्या अप्पर धरणाच्या मागील बाजूस नदीकाठावर बेशरमांच्या पसरलेल्या झुडपांमध्ये वयस्क वाघाचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच शवविच्छेदन करू वाघाच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, अप्पर वर्धा धरणाचे बॅक वाॅटर साहूर रोहणा या गावादरम्यान असून २४ रोजी सकाळी मासेमारी नियंत्रणासाठी असलेली पेट्रोलिंग बोट या भागात गस्तीवर असताना या चमूला निर्मनुष्य भागात एक वाघ मृतावस्थेत दिसून आला. गस्तीवरील चमूने ही माहिती तातडीने वनविभागाला कळविली. माहिती मिळताच प्रभारी उपवन संरक्षक तुषार ढमढेरे, सहाय्यक वन संरक्षक बी. एल. ठाकूर, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, आष्टी वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील, आर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. वाघाचा मृतदेह किमान आठ-दहा दिवसांपासून येथे पडून असल्याने इतर मांसाहारी वन्यप्राण्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे दिसून आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंधारे, डॉ. कोहाड, डॉ. बांगरे व डॉ. कांबळे या चमूने मृत वाघाचे मौका स्थळी परीक्षण करून वैद्यकीय परीक्षणासाठी नमुने संकलीत केले. वाघाच्या मृतदेहाजवळ वन्यप्राण्यांची पदचिन्हे आढळून आली. तसेच वाघाचे दात झिजलेले व गळून पडलेले दिसून आले. मृत वाघ साधारणतः १३ – १४ वर्षांचा असून नैसर्गिक मृत्यू झाला असावा व शव नदीच्या प्रवाहात वाहत आले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.