गोरेवाड्याच्या नामकरणाला आदिवासी बांधवांचा तीव्र विरोध
आल्यानंतर आदिवासी संघटनांच्या जनसभेत या विरुद्ध प्रचंड आक्रोश उमटला
नागपूर |
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आल्यानंतर आदिवासी संघटनांच्या जनसभेत या विरुद्ध प्रचंड आक्रोश उमटला. जनसभेत नामकरणाला विरोध करण्यात आला. या प्राणी संग्रहालयाचे नाव हे गोंडवाना-गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. गत २३ जानेवारी रोजी राज्य शासनाकडून गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर नागपूरसह विदर्भातील आदिवासी समाज संघटना आणि नागरिकांकडून विरोध सुरू आहे. त्यानंतर प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी यासंदर्भात राजे बख्त बुलंदशहा यांच्या पुतळ्यासमोर जनसभा झाली. या जनसभेत हा निर्णय घेण्यात आला. माजी महापौर मायाताई इवनाते यांच्या पुढाकारातून झालेल्या या सभेला आ. डॉ. अशोक उईके, आ. डॉ. संदीप धुर्वे, आ. डॉ. देवराव होळी, राजे वीरेंद्र शहा उईके, माजी आमदार संजय पुराम, अरविंद गेडाम, प्रभुदास भिलवेकर, रमेश मावसकर, मधुकर उईके, दिनेश शेराम, हरी उईके, अमित कोवे, राजेंद्र मरस्कोल्हे, एम.एम. आत्राम, प्रकाश गेडाम, रंजिता कोडापे, आकाश मडावी, विवेक नागभिडे आदी उपस्थित होते. नागपूर शहराचे संस्थापक हे राजे बख्त बुलंदशाह होते. ही गोंडराजाची राजधानी होती. हा इतिहास नजरेपुढे ठेवून आणि आदिवासी समाजाच्या भावना लक्षात घेऊन या प्रकल्पाला गोंडवाना-गोरेवाडा असे नाव सरकारने द्यावे, अशी मागणी जनसभेत करण्यात आली. दरम्यान, प्रकल्पाचे उद््घाटन झाल्यावर मुख्यमंत्री आंदोलकांच्या पाच व्यक्तींच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतील, असा निरोप पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून मायाताई इवनाते यांच्याकडे गेला. मात्र व्यासपीठावरील नेत्यांनी आणि इवनाते यांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. शिष्टमंडळ भेटीला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सभास्थळी येऊन सर्व समाजबांधवांशी संवाद साधावा, अशी भूमिका मांडण्यात आली होती. |