पश्चिम महाराष्ट्रातील कृषी वीज ग्राहकांचे अडीच हजार कोटी माफ, वीजबिल कोरे करण्याची संधी

Share This News

राज्याच्या कृषीपंप वीजजोडणी धोरण 2020 अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्याने कृषिपंपधारकांसह 12 लाख 46 हजार 455 कृषी वीजग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या ग्राहकांकडे सद्यस्थितीत 10824 कोटी 56 लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण 2 हजार 638 कोटी 51 लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आले आहे.

या कृषी ग्राहकांनी उरलेल्या 8186 कोटींच्या मूळ थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित 50 टक्के म्हणजे 4093 कोटींची रक्कम माफ करण्यात येणार आहे. सोबतच त्यांचे थकीत वीजबिल देखील कोरे होणार आहे.

कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या तसेच वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकी, व्याज व विलंब आकारात सवलत देणारे स्वतंत्र धोरण ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून नुकतेच जाहीर झाले आहे. या धोरणानुसार थकबाकीसह चालू वीजबिलांद्वारे वसुल झालेल्या एकूण रकमेपैकी 33 टक्के रक्कम ग्रामपंचायत क्षेत्रात तर 33 टक्के रक्कम जिल्हास्तरीय क्षेत्रात नवीन उपकेंद्र, वाहिन्यांसह वीज यंत्रणेच्या सक्षमीकरण तसेच विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.

कृषिपंप वीजजोडणी धोरण 2020 मध्ये प्रामुख्याने कृषिपंपासह सर्व उच्च व लघुदाब कृषी ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या 5 वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर 2015 पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार 100 टक्के माफ करून व्याज हे 18 टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यात 182539 कृषी ग्राहक असून त्यांच्याकडे 773 कोटी 6 लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे 105 कोटी 15 लाख माफ करण्यात आले आहे. तर उरलेल्या मूळ थकबाकीच्या 668 कोटी 48 लाखांपैकी 50 टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित 50 टक्के म्हणजे 334 कोटी 24 लाखांची रक्कम माफ करण्यात येणार आहे.

थकबाकीमुक्तीच्या योजनेनुसार जिल्ह्यातील थकबाकीदार सर्व कृषी ग्राहकांनी त्यांच्या मूळ थकबाकीच्या 50 टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येणार आहे. म्हणजेच येत्या वर्षभरात कृषी ग्राहकांनी मूळ थकबाकीच्या 334 कोटी 24 लाख रुपयांचा भरणा केल्यास उर्वरित थकबाकीची तेवढीच रक्कम माफ करण्यात येणार आहे.

ज्या ग्राहकांनी या योजनेत एक ते तीन वर्षांसाठी सहभाग घेतला त्यांनी त्या-त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के माफ करण्यात येईल. तसेच मूळ थकबाकीचा भरणा करताना चालू वीजबिलांची रक्कम भरणे देखील आवश्यक आहे.

वीजबिल थकबाकीमुक्तीची ही योजना अत्यंत महत्वाची असल्याने महावितरणकडून जिल्ह्यातील कृषी ग्राहकांशी थेट संवाद साधून या योजनेची माहिती देण्यात येत आहे. तसेच वीजबिलांबाबत शंका किंवा तक्रारी असल्यास त्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी सर्व कार्यालयांना दिल्या आहेत.

कृषी ग्राहकांना वीजबिलांची थकबाकी, माफी व भरावयाची रक्कम आदींचा तपशील महावितरणने https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/ या वेबपोर्टलवर मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून दिला आहे. केवळ ग्राहक क्रमांक सबमीट केल्यानंतर योजनेनुसार सवलत व भरावयाच्या रकमेसह इतर संपूर्ण तपशील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या कार्यालयात संपर्क साधावा व वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.