छत्तीसगड मधील दोन जहाल नक्षल्यांना अहेरीत अटक | Two extremist Naxals arrested in Chhattisgarh
जिल्हय़ातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या छत्तीसगड राज्यातील दोन जहाल नक्षल्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश आले आहे. मंगलु वंजा कुड्यामी (२0) रा. ईरपागुट्टा जि. बिजापूर (छत्तीसगड) व मदनया ऊर्फ सूर्या सोमया तलांडी (३८) रा. येडापल्ली जि. बिजापूर (छत्तीसगड) अशी अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षल्यांची नावे आहेत.
९ फेब्रुवारी रोजी प्राणहिता येथील सी-६0 जवानांचे पथक व उपपोलिस ठाणे दामरंचा येथील पोलिस पथक भंगारामपेठा, कुतार्घाट जंगल परिसरात संयुक्तरित्या नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना सदर दोन्ही जहाल नक्षलवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मंगलू कुड्यामी हा सन २0१८ पासून संॅड्रा दलममध्ये सदस्य म्हणून कार्यरत असून त्याचा सन २0१९ साली दामरंचा हद्दीतील कुतार्घाट येथे घडून आलेल्या पोलिस-नक्षली चकमकीत प्रत्यक्ष सहभाग होता. त्याचेवर जिल्हय़ातील विविध पोलिस, उपपोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर मदनय्या ऊर्फ सूर्या सोमय्या तलांडी हा सन २00५ पासून नक्षल चळवळीत कार्यरत आहे.
तो प्रारंभी संॅड्रा दलममध्ये कार्यरत होता. सन २00७ मध्ये त्याची ईडापल्ली जनमिलीशिया कंपनी दलममध्ये बदली झाली.
सध्यायाच नक्षल कंपनीमध्ये सेक्शन कमांडर पदावर तो कार्यरत आहे. त्याचाही कुतार्घाट चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग होता. त्याच्यावर छत्तीसगड राज्यातील अनेक पोलिस ठाण्यामध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच छत्तीसगड राज्यातील पर्सेगुडम पोलिस ठाणेद्वारे त्याचे विरोधात वॉरंट काढण्यात आल्याची माहिती आहे.
सदर दोन्ही जहाल नक्षल्यांचा आणखी किती गंभीर गुन्हांमध्ये सहभाग आहे, याचा गडचिरोली पोलिस दल तपास करीत आहेत.