भंडारा जिल्ह्यातील कलेवाडा येथे विहिरीत पडल्याने दोन बिबट्यांचा मृत्यू
भंडारा : विहिरीत दोन बिबट्यांचा मृतदेह आढळल्यानंतर वन विभागाने संशयाच्या आधारात शेतमालकाला ताब्यात घेतले आहे. अड्याळ वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कलेवाडा येथील एका शेतातील विहिरीत दोन बिबट मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाने अड्याळ परिसर गाठत बिबट्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. उत्तरीय तपासणीनंतर बिबट्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याचे नेमके कारण कळेल, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडाऱ्यातील कलेवाडा गाव संरक्षित जंगलाला लागून आहे. त्यामुळे या गावाच्या आसपास वन्यप्राण्यांचा वावर असतो. सोमवारी याच गावातील शेतशिवारातील विहिरीत दोन नर बिबट मृतावस्थेत आढळले. या बिबट्यांची काही नखे गायब होती. बिबट्यांचा मृत्यू विजेचा शॉक दिल्यामुळे किंवा विषबाधेमुळे झाला काय, याबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी ठाम निष्कर्ष दिला नाही. त्यामुळे बिबट्यांच्या मृत्यूचे गुढ वाढले आहे. उपवनसंरक्षक भलावी यांनी सहाय्यक वनसंरक्षकांच्या नेतृत्वात एक पथक तयार करुन चौकशी सुरू केली आहे. या पथकाने कलेवाडा परिसरात खास अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. विहिरीत आढळलेले बिबट्यांचे शव कुजले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू किती दिवसांपूर्वी झाला, याचा शोध घेतला जात आहे. ही बाब शेतमालकाच्या लक्षात कशी आली नाही, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संशयित म्हणून शेतमालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.