जरीपटक्यात १२ तासांत दोन खून

Share This News

नागपूर
होळी संपताच जरीपटक्यात खुनी होळी खेळणे सुरू झाले आहे. होळीच्या दिवशी घरासमोर लघुश्ांका करण्यावरून झालेल्या वादातून बापलेकांनी मिळून एका युवकाच्या छातीत चाकू भोसकून खून केल्याची घटना १ एप्रिलला रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास जरीपटका हद्दीत रिपब्लिकननगर येथे घडली. रोहित किसनाजी वाघमारे (२५) रा. रिपब्लिकननगर असे मृताचे नाव आहे. तर सतत सोबत राहणार्‍या सहाय्यकाने टिपच्या वादातून डेकोरेशन चालकाचा खून केल्याची घटना जरीपटका मार्केट येथे २ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास घडली आहे. जितू असे मृताचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, रिपब्लिकननगर गल्ली क्र. १२ येथे राहणारा रोहित किसनाजी वाघमारे (२५) हा पेंटिंगचे काम करतो. होळीच्या दिवशी त्याच्या घरापासून दोन गल्ली दूर राहणार्‍या हर्षद देवीदास जांभूळकर (३४) याच्यासोबत गाडी पार्क करण्यावरून त्याचा वाद झाला. हर्षद हा उभा असताना रोहितने त्याच्यासमोर गाडी लावली होती. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. १ एप्रिलला रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास रोहित हा त्याचा मित्र पीयूष किशोर भैसारे (२४) रा. लष्करीबाग याच्यासोबत त्याच्या बहिणीच्या नणंदेकडे जात होता. दरम्यान, रिपब्लिकननगरातून जात असताना गल्ली क्र. ६ येथे राहणारा हर्षदने रोहितला पाहिले. जुन्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वाद वाढत गेला. त्यात हर्षद याचा भाऊ भूपेंद्र देवीदास जांभूळकर (३३), शैलेंद्र देवीदास जांभूळकर (२६) आणि देवीदास जेठाजी जांभूळकर (६0) हेदेखील रोहितशी भांडू लागले. दरम्यान, शैलेंद्र याने त्याच्या घरातून चाकू आणून रोहितच्या छातीवर डाव्या बाजूला हृदयात प्राणघातक वार केला. रोहितवर खुनी हल्ला होत असताना रोहितचा चुलत भाऊ ऋषभ त्याला वाचविण्यासाठी आला असता आरोपी देवीदास याने सळईने त्याच्या डोक्यावर वार केला. यात ऋषभदेखील जखमी झाला. रोहितचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बापासह तीनही आरोपी मुलांना अटक करण्यात आली आहे. मृतकावर गुन्हे दाखल आहेत. तसेच मृतकावर प्रतिबंधक कारवाईही करण्यात आली होती.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.