दोन हजार कर्मचारी झटले; रेल्वे मार्ग झाला मोकळा Two thousand employees rallied; The railway line was cleared

Share This News

नागपूर : वणी-पिंपळखुटी रेल्वे मार्गावर मालगाडीचे १३ डबे घसरून झालेल्या अपघाताच्या ३८ तासांनंतर हा मार्ग आता वाहतुकीसाठी पूर्ववत झाला आहे. दोन हजार रेल्वे कर्मचाऱ्यांनी अविरतपणे काम करीत हा मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी खुला करून दिला आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेला वणी-पिंपळखुटी रेल्वे मार्गावर मालगाडी रूळांवरून घसरली होती. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात येणाऱ्या वणी-कायर दरम्यान सोमवार, १ मार्चला सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीच्या १३ वॅगन उलटल्या होत्या. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात कोळसा विखुरला. अपघातामुळे ६०० मीटरच्या लोहमार्गाचे नुकसान झाले होते. या मार्गावरील प्रवासी गाड्या गेल्या काही दिवसांपासून बंदच आहेत. लोहमार्ग पूर्ववत झाल्यानंतर येथुन मालगाड्या सोडण्यात आल्या. अपघातानंतर अनेक वॅगन उलटल्या होत्या. काही एकमेकांवर चढल्या होत्या. त्यावरून अपघाताच्या भीषणतेची कल्पना आली. २४ तासांनंतरही रेल्वे मार्ग सुरळीत न झाल्याचे कळताच मुंबईवरून मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक कार्यालयातून काही अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाच्या प्रबंधक ऋचा खरे यांनीही अपघातस्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त रेल्वे मार्ग सुरळीत करण्यासाठी दोन हजार कर्मचाऱ्यांना एकाचवेळी तैनात करण्यात आले.

असा केला मार्ग मोकळा

  • क्रेनच्या मदतीने एकमेकांवर चढलेल्या वॅगन बाजूला करण्यात आल्या.
  • रूळांवर विखुरलेला कोळसा आदी साहित्य उचलण्यात आले.
  • रात्रीही काम करता यावे, यासाठी संपूर्ण परिसर प्रकाशमान करण्यात आला.
  • कोळसा काढल्यानंतर अन्य वॅगन रूळांवरून काढण्यात आल्या.
  • अपघातामुळे नुकसानग्रस्त झालेले रूळांबाजूने विजेचे खांब उभारण्यात आलेत.
  • ओव्हर हेड विद्युत केबल तुटल्या होत्या. तुटलेल्या केबल्स बदलण्यात आल्या.
  • नागपूरसह मुंबईहून आलेले अधिकारी, अभियंता यांचे पथक २४ तास येथे राबले.
  • ६०० मीटर अंतराचे रूळ बसविण्यात आलेत. काही रूळ बदलण्यात आलेत.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.