अवकाळी पावसाचा फटका, बुलडाण्यात एक ठार

Share This News

नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. अशात वीज कोसळल्याने बुलडाणा जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका बसू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. तो खरा ठरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. बुलडाणा येथे गुरुवारी सकाळी मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अशात बुलडाणा तालुक्यातील तांदुळवाडी येथे वीज कोसळली. त्यात बाबुराव रिंढे (वय ६०) यांचा मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिली. अवकाळी पावसामुळे हरभरा आणि गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. चिखली तालुक्यातील उत्रादा येथे वीज कोसळल्याने रामेश्वर इंगळे यांच्या शेतातील हरभऱ्याची सुडी पेटून खाक झाली.

विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, गोंदिया जिल्ह्यांत बुधवार, गुरुवारी वादळी पाऊस झाला. वादळी पावसाची ही परिस्थिती शुक्रवारपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे. शुक्रवारी नागपूर शहरासह वर्धा, वाशीम, यवतमाळ आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा फटका रब्बीच्या पिकांना बसला आहे. पावसामुळे गुरुवारी विदर्भातील तापमानात कमालीची घट झाली. अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात रब्बी पिके व संत्र्यास फटका बसला आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू, हिंगणघाट आणि वर्धा तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. सेवाग्राम, वरुड, खरांगणा (गोडे) पवनार , मदनी, करंजी (काजी) भागात देखील पावसाची नोंद झाली आहे. पावसाने गहू आणि चन्याचे नुकसान झाले आहे. आष्टी तालुक्याच्या भारसवाडा नजीक झाडावर वीज कोसळली. गोंदिया जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यांत पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील कडधान्यांना फटका बसला आहे. आंब्याचा मोहर गळून पडला आहे. अनेक ठिकाणी तूर, लाखोरी, हरभरा, जवस आदी कडधान्यांचे नुकसान झाले आहे. असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. आमगाव, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव, सालेकसा तालुक्यातही पाऊस झाला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.