कोरोना लसीचा जानेवारीपासून वापर
कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापरास जानेवारी महिन्याच्या प्रारंभापासून सुरुवात केली जाणार असल्याची माहिती ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. कोरोनावरील अनेक लसींचे परीक्षण अंतिम टप्प्यात आले असून लवकरच या लसी बाजारात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चालू महिन्याच्या अखेरपयर्ंत अथवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला भारतीय नियामक संस्थांकडून लसींच्या आपत्कालीन वापराची परवानगी प्राप्त होईल, त्यांनंतर गंभीर रुग्णांना लस देणे शक्य होईल, असे सांगून डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले की, कोरोनावरील लस आता आवाक्यात असल्याने कोल्ड चेन बनविणे, उपयुक्त स्टोरेज वेअरहाऊस उपलब्ध करणे, लसीकरण तसेच सुयांची उपलब्धता यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारांदरम्यान युद्ध स्तरावर काम सुरु आहे. लस सुरक्षित असल्याने त्याचा निश्चितपणे कोरोना नियंत्रणासाठी फायदा होणार आहे. लस बनवित सुरक्षा आणि प्रभावकारकता यात कुठेही तडजोड करण्यात आलेली नाही.
सुमारे ७0 ते ८0 हजार स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. त्यांच्यात कोणताही प्रतिकूल प्रभाव दिसून आलेला नाही, असे डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले. अल्पावधीच्या काळात लस सुरक्षित असल्याचे यामुळे सिद्ध झाले आहे, असे सांगत ते म्हणाले की, देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत आपणास योग्य व्यवहार ठेवावा लागेल. पुढील दोन ते तीन महिने जर आपण संयम बाळगला तर एका मोठय़ा परिवर्तनाच्या निकट आपण पोहोचू. लस बाजारात आल्यानंतर सुरुवातीला सवार्ना ती देणे शक्य होणार नाही. कोविडमुळे मृत्यूमुखी पडण्याची शक्यता जास्त ज्या लोकांत आहे, अशा लोकांचे सर्वप्रथम लसीकरण करावे लागेल. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक, विविध आजारांनी ग्रस्त असलेले नागरिक यांना लस द्यावी लागेल. बुस्टर खुराक देण्यात आल्यानंतर शरीरात चांगल्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार होण्यास सुरुवात होईल. कित्येक महिने यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल. तोपयर्ंत संक्रमित लोकांची संख्या खूप मोठय़ा प्रमाणात कमी होईल.
देशात सध्या सहा लसींवर काम सुरू आहे. यांपैकी दोन लसींचे शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. भारतात अनेक लसींच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या लसींपैकी कोणत्याही लसीचा आपत्कालीन वापराची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे