18 वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या, केंद्राकडे पाठपुरावा करा; नाना पटोलेंची मागणी

Share This News

मुंबई: संपूर्ण देशात काल 1 फेब्रुवारी रोजी 45 वर्षावरील व्यक्तिंना कोरोना लस  देण्यात येत आहे. मात्र, 20 ते 45 वयोगटातील तरुणांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याने राज्यात 18 वर्षांवरील तरुणांना सरसकट कोरोनाची लस देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच पटोले यांनी याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणीही केली आहे.

नाना पटोले यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही मागणी केली. राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. दुसरीकडे लसीकरणाची मोहिमही राबिवली जात आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील लोकांना लस देण्यास सुरुवात केली ही चांगली बाब असली तरी सध्यस्थितीत तरुणांमध्ये कोरोनाची लागण झपाट्याने होत असल्याचे समोर आल्याने वयाची अट शिथिल करणे ही काळाची गरज आहे. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी परवानगी मिळवावी व राज्यभर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घ्यावी, असं पटोले यांनी म्हटलं आहे.

तर कोरोनाची साखळी तोडणे शक्य होईल

कोरोनाचा बदललेला विषाणू घातक असून संक्रमणाचा वेगही अधिक आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तेव्हापासून 20 ते 45 वयोगटातील तरुणांना याचा संसर्ग झाल्याचे पाहायला मिळत आहे. नोकरी, कामानिमित्त घराबाहेर पडणारे हे तरुण घरी येऊन घरातील वयोवृद्ध, लहान मुलांमध्ये त्याचा संसर्ग होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी 18 वर्षांवरील तरुणांना लस देणे गरजेचे आहे. या वर्गातील सर्वांना लस दिली तर कोरोना संक्रमणाची साखळी तोडणे सोपे होईल. देशात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असतानाही केवळ वयाच्या अटीमुळे तरुणांना लस घेता येत नाही हे दुर्दैवी आहे. ज्या झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगाने लसीकरण केले गेले पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.

गरज महाराष्ट्राला पुरवठा पाकिस्तानला

महाराष्ट्राला कोरोना लसीची नितांत गरज असताना केंद्र सरकार मात्र अत्यल्प लस पुरवठा करत आहे आणि पाकिस्तानसह इतर देशांना मोफत लस देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या देशात जास्त असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करा, अशी मागणी करतानाच जनतेनेही कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे. मास्क वापरणे, साबणाने हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टंसिंगचे पालन या त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पोलिओवर मात होते, कोरोनावर का नाही?

देशात महामारी ही काही पहिल्यांदा आलेली नाही. काँग्रेसचे सरकार असताना महामारींचा सामना करावा लागला होता. त्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने योग्य नियोजन करुन त्यावर यशस्वी मात केली. पोलिओ लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमणात राबविली, बस स्टँट, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवल्याने त्यावर मात करण्यात यश आले. पोलिओवर जर मात करता येऊ शकली तर कोरोनावर मात करणेही शक्य आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा केल्यास कोरोनाच्या महामारीवरही नक्कीच मात करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.