जिल्ह्यातील आरोग्य संस्थामध्ये एकाच दिवशी 8546 व्यक्तींचे लसीकरण

Share This News

गोंदिया,दि.4 : एकीकडे कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करताना अधिकाधिक व्यक्तींच्या लसीकरणासाठी प्रयत्न होवू लागलेत. गोंदिया जिल्ह्यात कोविड-19 चा प्रभाव वाढू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने 40 प्राथमिक आरोग्य केंद्र व 100 आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून गावनिहाय लसीकरण सुरु करण्यात आले आहे.जिल्ह्यात सुमारे 250 च्यावर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून अद्यापही पुर्ण उपकेंद्रावर लसीकरण सुरु झाले नसल्याने गावापर्यंत लसीकरण मोहीम पाहिजे तशी पोचू शकलेली नाही.शासनाच्या निर्देशानुसार वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय,उपजिल्हारुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणीच लसीकरण करावयाचे असून याठिकाणी नागरिकांना लसीकरणासाठी आशासेविका,आरोग्यसेविका,ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावनिहाय निरोप देऊन पाठविले जात आहे.जिल्ह्यात 3 मार्च रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी 8546 व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.उल्लेखनीय म्हणजे,आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील गावनिहाय लसीकरणाचा उपक्रम गोंदिया जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येत आहे.

45 वर्षे व त्यापुढील वयोगटातील व्यक्तींना प्रथम लस देण्याचे शासनाचे धोरण आहे. कोविड-19 च्या वाढत्या प्रभावावर प्रतिबंधात्मक उपायासोबतच लसीकरण सुद्धा गरजेचे आहे. गोंदिया जिल्ह्यात कोविड-19 चा प्रभाव वाढू नये, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.नितिन कापसे व सर्व तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिकारी यांनी आरोग्य विभागाच्या संस्थामधून लसीकरणाला सुरुवात केली आहे.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्यासह गावस्तरावर सरपंच, केंद्रप्रमुख, शिक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांनी लसीकरणासाठी प्रयत्न करीत आहेत.कोविड-19 चा प्रभाव संपूर्ण राज्यात वाढत आहे. चक्राकार गतीने वाढणार्‍या या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय अत्यंत गरजेचे आहेत. लसीकरणासह संबंधित सर्वच व्यक्तींनी चेहर्‍यावर मास्क लावावे. विना मास्क घराबाहेर पडू नये. दोन व्यक्तींच्या मध्ये किमान सहा फुटाचे अंतर पाळावे. वारंवार साबनाने हात धुवावे. गरज नसेल तर घराबाहेर पडू नये. तसेच आपल्या गावातील लसीकरण केंद्रावर जावून लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांनी केले आहे.

लस पूर्णतः सुरक्षित असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे मत व्यक्त करून लसीकरणासाठी प्रयत्नशील असलेल्या तथा प्रत्यक्षात गावस्तरावर कार्य करणारे अधिकारी कर्मचार्‍यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांनी अभिनंदन केले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.