वाराणसीच्या विकास कार्यांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुभारंभ
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर
पंतप्रधान आणि वाराणसीचे खासदार नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी विविध विकास कार्याचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. दृक-श्राव्य माध्यमाद्वारे झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी आणि पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा शुभारंभ केला. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी एकूण 614 कोटी रुपये खर्च आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रकल्पांच्या काही लाभार्थ्यांशी चर्चा केली आणि संवाद साधला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अन्य मान्यवर यावेळी दृक-श्राव्य माध्यमाद्वारे उपस्थिती होते.
या प्रकल्पांमध्ये सारनाथ येथील लाईट अँड साऊंड शो, रामनगर येथील लाल बहादूर शास्त्री रुग्णालयाचे अद्ययावतीकरण, गायींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठीच्या पायाभूत सुविधा, बहुपयोगी बियाणे साठवणूक केंद्र, 100 मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेले कृषीमाल गोदाम, आयपीडीएस टप्पा दुसरा, संपूर्णानंद स्टेडीयममधील खेळाडूंसाठीचे गृहसंकुल/वसतिगृह, वाराणसी शहर स्मार्ट दिवे व्यवस्था, 105 अंगणवाडी केंद्र आणि 102 गौ आश्रय केंद्र या सर्व प्रकल्पांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी काही प्रकल्पांचे भूमिपूजन -पायाभरणी देखील केली. यात, दशाश्वमेघ घाट आणि खिडकीया घाटाचा पुनर्विकास, पीएसी पोलीस दलासाठी बरॅक्सची उभारणी, काशी येथील काही रहिवासी वस्त्यांचा पुनर्विकास, बेनिया बाग येथील उद्यानाचा पुनर्विकास आणि वाहनतळ सुविधा, गिरीजा देवी सांस्कृतिक संकुल येथील बहुपयोगी सभागृहाचे अद्ययावतीकरण आणि शहरातील रस्त्यांची दुरुस्तीकामे तसेच पर्यटन स्थळांची विकासकामे, इत्यादींचा समावेश आहे.