प.बंगालची वाघीण जिंकली, आता कोरोनाकडे लक्ष देऊया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Share This News

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. यात पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षानं दणदणीत विजय प्राप्त केला आहे. ममता बॅनर्जींच्या विजयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ममता दीदींचे अभिनंदन केलं आहे. यासोबतच भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा देखील साधला आहे . ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभीमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल, अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी प.बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज प. बंगाली जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही प.बंगालमध्ये निवडणुकीचा मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू होता. यात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान कार्यालयात अनेकदा फोन केले त्यावर पंतप्रधान प.बंगालच्या प्रचारात व्यग्र आहेत असा संदेश देण्यात आल्याची माहिती याआधी समोर आली होती. याच मुद्द्याला धरून उद्धव ठाकरे यांनी आज प.बंगालच्या निकालानंतर आता राजकारण संपलं असेल तर कोरोना विरुद्धच्या लढाईकडे लक्ष द्या, असं सांगत भाजपला टोला लगावला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.