वर्धा : अंकिता जळीतकांड प्रकरणाची सुनावणी आजपासून
राज्यात गाजलेल्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाच्या सुनावणीला सोमवारपासून न्यायालयात सुरुवात होणार आहे. या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्जवल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार उज्जवल निकम सोमवारी हिंगणघाट न्यायालयात युक्तिवाद करण्यासाठी हजर होतील.
३ फेब्रुवारी २0२0 रोजी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुने तरुणीवर पेट्रोल टाकून तिला जाळले होते. सात दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर या तरुणीचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात रोष निर्माण झाला होता. या प्रकरणातील आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे.
हिंगणघाट जळीतकांडानंतर राज्यभरात निर्माण झालेला रोष पाहता सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीन महिन्यांत खटला निकाली काढून आरोपीला शासन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया खोळंबली होती.
पोलिसांनी हिंगणघाटच्या घटनेनंतर अवघ्या २५ दिवसांत म्हणजे २८ फेब्रुवारीला न्यायालयात ४२६ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. तसचे हा खटला चालवण्यासाठी वध्र्यात फास्ट ट्रॅक कोर्ट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, हा अर्ज मंजूर न झाल्याने याप्रकरणाची सुनावणी हिंगणघाट येथे पार पडणार आहे. न्यायालयात आरोपी विक्की नगराळेवर आरोप ठेवण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
नक्की काय घडलं हिंगणघाटमध्ये?
हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेली पीडिता ३ फेब्रुवारीला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला आली. आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर दबा धरून बसला होता. ती दिसताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात ही तरुणी ४0 टक्के होरपळली. नागपूमधील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी तिची प्राणज्योत मालवली.
कोण आहे विक्की नगराळे?
आरोपी विक्की नगराळे याचे लग्न झाले असून त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. या घटनेपूर्वी तीन महिन्यांपूर्वी त्याने पीडितेला त्रास दिला होता. याआधी तिचा जुळलेला विवाह तुटल्याने पीडितेच्या वडिलांनी आरोपीला खडसावले होते.
विकेश उर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे. या घटनेनंतर राज्यभरात विक्की नगराळेविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळात वध्र्यातील कारागृहात पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात होती. कारागृहात विक्कीवर इतर कैद्याकडून हल्ला होण्याची शक्यता होती. त्यामुळे बॅरेकमधील काही कैद्यांना दुसरीकडे स्थलांतरित केलं आहे. विक्कीला अटक करुन तुरुंगात आणण्यात आलं तेव्हा त्याच्याबरोबर बॅरेकमध्ये १२ ते १५ कैदी होते. मात्र, त्यानंतर या बॅरेकमध्ये केवळ फक्त पाच कैदी ठेवण्यात आले होते.