बुलडाण्यात गोदाम आगीत ३ हजार टन सरकीची राखरांगोळी

Share This News

बुलडाणा: सरकीच्या गोदामाला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने या आगीत ३ हजार टन सरकी जळून खाक झाल्याची घटना खामगाव येथे घडली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जळालेल्या सरकीच्या धुराचे लोट दीड किलोमीटरपर्यंत पसरले होते.
खामगाव येथील चिखली मार्गावर अशोक गोयनका यांच्या मालकीचे रायगड नावाचे हे खासगी गोदाम आहे. या गोदामात गोयनका यांनी सरकीचा साठा केला होता. या सरकीच्या साठ्याने सोमवारी दुपारी २ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पेट घेतला. दुपारच्या तीव्र उन्हामुळे पाहता पाहता या आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे लोळ मोठया प्रमाणात गेट व खिडक्यांमधून बाहेर येत होते. या आगीत गोदामातील सुमारे ३ हजार टन सरकी जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
आग इतकी भीषण होती की धुराचे लोट दीड किलोमीटरपर्यंतच्या परिसरात पसरले होते. आगीची माहिती मिळताच, खामगाव अग्निशमन विभागाचे दोन बंब दुपारी साडेतीन वाजेपर्यंत घटनास्थळी पोहचले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.