हतबलतेची आम्हाला लाज वाटते, उच्च न्यायालयानं व्यक्त केली तीव्र नाराजी

Share This News

नागपूर : रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दररोज करोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर तत्काळ रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या दहा हजार व्हायल्स नागपूरला पुरविण्याचा आदेश दिला होता. परंतु, त्या आदेशाची पुर्तता करण्यात शासन-प्रशासन अपयशी ठरले आहे. कुणालाही कायद्याची भीती राहीलेली नाही. अशा पापी समाजाचा आम्हीदेखील एक घटक असून रुग्णांसाठी काहीच करू शकत नसल्याच्या हतबलतेची आम्हाला लाज वाटतेय, अशी मौखिक टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली.
नागपूरला रेमडेसिव्हिरचा अत्यंत तोकडा पुरवठा होत आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी १९ एप्रिल रोजी न्यायालयाने तत्काळ दहा हजार व्हायल्स पुरविण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. त्या आदेशाची सरकार अंमलबजावणी करू शकले नाही. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी शिशिर पांडे आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त व्ही. ए. कोसे यांनी परस्परविरोधी दाखल केलेल्या शपथपत्रावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
बुधवारी दुपारी २.३० वाजता याप्रकरणी न्या. सुनील शुक्रे आणि न्या. एस. एम. मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही स्वत:ची जबाबदारी टाळत आहात. प्रत्येक जण एकमेकाकडे बोट दाखवित आहे. तुम्हाला कायद्याची भीती राहीलेली नाही. किमान स्वत:चा आत्मा तरी जागरुक ठेवा. जबाबदारी झटकत नकारात्मकपणे कार्य करण्याची तुमची वृत्ती अत्यंत धोकादायक असल्याची तोंडी टीका न्यायालयाने केली.
शपथपत्रातील माहितीवरून संबंधित अधिकारी रुग्णांकडे दुर्लक्ष करत आहेत. तडफडून मरणारे रुग्ण त्यांच्यासाठी कुणीच नसल्याचे दिसून येत आहे. मुख्य म्हणजे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपूरला रेमडेसिव्हिरचा पुरवठा का कमी होतोय, याचे उत्तर दोन्ही शपथपत्रांमध्ये नाही. सरकार या समस्येवर उत्तर शोधू इच्छित नाहीये. तसेच स्थानिक आणि मुंबईतील उच्चस्तरीय अधिकारी मिळून रेमडेसिव्हिरच्या असमान आणि असमाधानकारक पुरवठ्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करत आहे, असे मौखिक ताशेरे न्यायालयाने सुनावणीदरम्यान ओढले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.