राज्यांन सोबतच्या चर्चेनंतर लसीची किंमत ठरवू
कोरोनाबाबत सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
भारतात अद्यापही करोनाचा प्रसार कमी झालेला नाही. करोनावर कायमस्वरूपी उपाय म्हणून लसींची निर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या देशामध्ये आठ लसींची चाचणी सुरु असून त्यापैकी तीन लसी या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या आहेत. करोनासंदर्भातील लसीसाठी फारशी वाट पहावी लागणार नाही. पुढील काही आठवड्यांमध्ये लस उपलब्ध होईल. करोना लसीसाठी कंपन्यांची पूर्ण तयारी असून वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दिल्यानंतर तातडीने लसीकरण सुरु केले जाईल. लसीची किंमत किती असेल? असा प्रश्न स्वाभाविक असला तरी केंद्र सरकार यासंदर्भात राज्य सरकारांशी चर्चा करत आहे. लसीची किंमत ही जनस्वास्थ्याला प्राथमिकता देऊनच निश्चित केली जाईल आणि राज्य सरकार या निर्णयप्रक्रियेत सहभागी असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
देशातील करोनाची सद्यपरिस्थिती या विषयावर आज सर्वपक्षीय बैठक झाली. त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान मोदी होते. या बैठकीत सरकारकडून नजीकच्या भविष्यकाळात करोनाच्या लसीचे वितरण करण्याबाबत चर्चा झाली. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करत करोना लस कधी मिळेल आणि त्याची किंमत किती असेल यासंदर्भात माहिती दिली. सध्या जगभरात विविध कंपन्या करोनावरील लस वितरित करताना दिसत आहेत. त्या लसींची किंमत तुलनेने जास्त आहे. सर्व जग सध्या वाजवी दरातील परिणामकारक लसीची वाट पाहत आहेत. त्यामुळे सार्या जगाचे लक्ष भारतात चालू असलेल्या संशोधनाकडेदेखील आहे. करोना लसीकरणाच्या वेळी आजारी नागरिक आणि वृद्ध नागरिक यांना प्राधान्य दिले जाईल. त्याचप्रमाणे फ्रण्ट लाइनवर काम करणार्यांना म्हणजेच आरोग्य कर्मचारी, पोलिस आणि इतर अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना लस देताना प्राधान्य दिले जाईल. सर्व राजकीय पक्षांनी आणि देशातील नागरिकांनी या लसीकरणासंदर्भात सहकार्य करावे, असे पंतप्रधान मोदी यांनी आवाहन केले.