राज्यावर आजही अवकाळी संकट, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार

Share This News

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरात पावसाच्या हलक्या सरी आज सकाळपासून पाहायला मिळाल्या. आकाश ढगाळलेले, विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. पावसामुळे काही काळासाठी वाहतूक मंदावली. इतकंच नाहीतर आगामी काही तासात शहर जिल्ह्यात आणखी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर पाहायला मिळाला. काही गावांत झालेल्या गारपीटीचा गहू, कांदा, संत्रा, हरभरा पिकांना फटका बसला आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे

मराठवाड्यात अवकाळी पाऊस

वाशिम शहरात अचानक अवकाळी पावसासोबत गारपीटीने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील हिंगोली नाका इथल्या कृषी उत्पन्न बाजार समिती समोररील झाडावरचे शेकडो पोपट मृत्यूमुखी पडलेत. तर अनेक पक्षी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पक्षीमित्रांकडून उपचार केले जात आहेत. तर शेकडो पोपट मृत्यूमुखी पडल्याने पक्षीमित्रांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागपूरमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात

नागपुरात विजांच्या गडगडाटसह रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. वर्ध्यामध्ये अनेक भागात अवकाळी पावसाचा हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. जिल्ह्याच्या देवळी, वर्धा, हिंगणघाट, सेलू, समुद्रपूर आणि आर्वी तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. या जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं.

नांदेडमध्ये मात्र उन्हाची तीव्रता वाढली

मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढल्याचे दिसून येत आहे. वाढत्या उन्हामुळे ग्रामीण भागातील रस्ते सुनसान झाले आहेत. तर उन्हाच्या झळा वाढल्याने शेत शिवार देखील निर्मनुष्य बनलं आहे. सद्यस्थितीत नांदेडचे कमाल तापमान हे चाळीस अंशापर्यंत गेलं आहे.

काय म्हणाले हवामानतज्ज्ञ?

महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात पुढील चार दिवस वातावरणात मोठा बदल होणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होशाळीकर यांनी tv9 शी बोलताना वातावरण बदलाच्या वृत्ताला दुजोरा दिला. मध्य भारतातील वातावरण बदलाचा महाराहस्त्राच्या आतील भागात अधिक परिणाम होईल. मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढमध्ये पुढील चार दिवस पाऊस आणि गारपीट होईल. मुंबई आणि कोकण परिसरात पावसाची शक्यता नाही.

मुंबईत हंगामी तापमान असेल. गेल्या आठवड्यात मुंबईचा पारा 38 अंशांच्या विक्रमी पातळीवर गेला होता. मात्र आता तशी तापमानवाढ होणार नाही. तापमान सरासरीच्या पातळीवर असेल, असे होशाळीकर यांनी tv9 शी बोलताना सांगितले.

पुढील चार दिवस वातावरणात बदल

विदर्भ मराठवाडा भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या परिसरात दिवसा ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढले आहे, तर उन्हाचा पारा घसरला आहे. मागील तीन-चार दिवसांपासून मध्य प्रदेशातील विशेषतः पूर्व मध्य प्रदेशात अवकाळी पावसाला अनुकूल स्वरूपाचे वातावरण झाले आहे.

या विस्तारीत सिस्टीममुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती क्षेत्रात ढगाळलेले वातावरण, रात्रीच्या तापमानात किंचित घट, संध्याकाळी वादळ, गडगडाट आणि पावसाची हजेरी लागेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील चार दिवस वातावरण बदल दिसून येणार आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.