…कलाकारांनी काय करावं?

Share This News

आदरणीय

प्रिय, उद्धव ठाकरे साहेब

मुख्यमंत्री,

महाराष्ट्र राज्य

                          आपण या राज्याचे केवळ मुख्यमंत्रीच नाहीत तर स्वतः एक संवेदशील श्रेष्ठ कलावन्त आहात. आणि   कलावंतांच्या भावना कलावंत नीट  समजू शकतो म्हणून हा पत्रप्रपंच.

 पूर्व विदर्भात झाडीपट्टी रंगभूमीला दीडशे वर्षाचा समृद्ध इतिहास आहे. महाराष्ट्राच्या रंगभूमीचा सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम ह्या रंगभूमीनं केलं आहे. दरवर्षी  लाखो लोकांचे मनोरंजन आणि त्या  माध्यमातून सामाजिक आणि बौद्धिक प्रबोधन करण्याचं पुण्य काम येथील कलावंतांनी केलेलं आहे. त्याची दखल देशभर घेतली गेली आहे. ऑक्टोबर ते मार्च या काळात गावोगावी सनासारखे नाटके सादर होतात आणि करोडो रुपयांची उलाढाल ह्या नाटकांच्या माध्यमातून होते. त्यामुळे इथल्या सांस्कृतिक परंपरेचं जतन तर होतेच पण हजारो परिवारांचे जगणे सुकर होते. असे समजा की नाटक हे येथील लोकांच्या आणि कलावंतांच्या जगण्याचे प्रमुख स्तोत्र आहे.

पण कोरोना महामारीमुळे नाटकाचे सादरीकरणच होणार नसेल तर येथील कलावन्त भिकेला लागेल ही वास्तविकता फार भीषण आणि कलाक्षेत्रासाठी गंभीर आहे.

             मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्यातील हजारो कलावन्त आणि कलाव्रतिना झाडीपट्टीने आश्रय दिला. जगण्याचे बळ दिले. कलाकारांना आर्थिक सुबत्ता देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं. मात्र तोंडाला रंग फासेल तरच त्याचं पोट भरेल अन्यथा दुसरे कुठलेच मार्ग त्याची मदत करू शकत नाही ही भीषण आणि शापित परिस्थिती त्याच्या वाट्याला आली आहे. ‘केवळ नाटक हाच आपुला व्यवसाय’ स्वीकारणाऱ्या कलावंतांची अवस्था त्यामुळे फार चिंताजनक झाली आहे.

कोरोनामुळे यावर्षी नाटकच होणार नसेल तर पोट भरण्यासाठी ह्या कलावंतांकडे दुसरा कुठलाच मार्ग नाही. आयुष्यभर स्वतःला रंगभूमीला वाहून घेतलेला, सेलिब्रेटी म्हणून मानाने जगणारा, रंगभूमीवर प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत होऊन बसलेला नट, नटी पोटासाठी दुसरं कुठलं काम करू शकेल याचं उत्तर कुणापाशीच नाही. जवळजवळ 100 नाट्यसंस्था झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यात कार्यरत आहेत.नट, नटी, पडद्यामागचे कलावन्त, संगीतकार, प्रकाश योजनाकार, नेपथ्यकार, लेखक, रंगभूषाकार, गायक, वादक,नृत्यांगना आणि पेंडॉल चा व्यवसाय करणारे यांची संख्या दहा हजाराहून अधिक आहे. एवढे परिवार आज नाटकाच्या न होण्याने रस्त्यावर आले तर यांची जबाबदारी मायबाप बनून कुणी घ्यावी ह्याचे उत्तर आपणच द्यावे.

        साहेब,  नागपूर,पुण्या, मुंबईत संघर्ष करणाऱ्या कलाकारांना पोट भरण्याइतपतही ज्यावेळी  काम मिळत न्हवतं त्यावेळी एखाद्या आईप्रमाणे त्या कलावंतांना झाडीपट्टीने आश्रय दिला, आपल्या कुशीत घेतलं. पोटा पाण्याची व्यवस्था केली. आज ती आईच रुसली तर मुले जगतील कशी याचे उत्तर बापानी द्यायला हवे. आणि आपलं सरकार आज बापाच्या भूमिकेत आहे. तेव्हा उत्तर देण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे.

आजपर्यंत कुठल्याच सरकारने या रंगभूमीसाठी कवडीचीही मदत केली नाही. तरी कुणालाही भीक न मागता ही रंगभूमी एखाद्या श्रीमंत इंडस्ट्रीप्रमाणे स्वाभिमानाने उभी राहिली. पण कोरोनाची नजर हिला सुद्धा लागली. आणि उपासमारीच्या उंबरठ्यावर हजारो परिवार उघड्यावर पडतील अशी स्तिथी निर्माण झाली आहे. रडण्याने प्रश्न सुटत नाहीत हे येथील कलावंतांना चांगले माहीत आहे. पण कुणी कलावन्त भीकही मागू शकत नाही, कुणाकडे चाकरी करू शकत नाही, रंगभूमीची सेवा सोडून कुठला व्ययसाय पण करू शकत नाही. फक्त स्वाभिमानाने मरणाचं स्वागत तेवढं करू शकतो. पण ते करण्याइतपत तो दुबळा नक्कीच नाही.

मायबाप सरकार आता आपणच सांगावे अश्यावेळी नटराजाची उपासना करणाऱ्या ह्या शापित कलावंतांनी काय करावे?

आपला नम्र ….

-सदानंद बोरकर

एक रंगकर्मी


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.