आमदार असो की खासदार कारवाई करणार
नागपूर : राज्यात कोरोनाची परिस्थिती पुन्हा बिकट होत आहे. अशात आमदार असो की खासदार, सत्ताधारी असो की विरोधक जो शासनाचे नियम मोडेल त्याच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
अकोल्यात शिवजयंतीनिमित्त नियम मोडत मिरवणूक काढणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वडेट्टीवार यांनी वरील भूमिका स्पष्ट केली. कोरोनाबाबत शासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटींचे नागरिकांनी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश महाविकास आघाडी सरकारने दिलेले आहेत. त्यातून लोकप्रतिनिधींनाही वगळता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. उत्सव, समारंभ, सभा आदींच्या आयोजनात कोरोनासंदर्भातील नियम पाळणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत कुणी नियम मोडत असेल तर सत्ताधारी, विरोधक असा भेट न करता कारवाई करण्यात येईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.