कोरोना आव्हानामुळे एकत्रित प्रतिसादाची गरज : डॉ हर्षवर्धन WHO Executive Board meeting VC
नवी दिल्ली, 27 जानेवारी
जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या 148 व्या सत्राची बैठक दृकश्राव्य माध्यमाद्वारे झाली.
यावेळी आपले विचार मांडताना हर्षवर्धन म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीची ज्यांना गरज आहे अशा लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवण्याचे आपले कार्य जारी राखण्यासाठी अनेक सदस्यांनी दिलेल्या व्यापक पाठींब्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळाले. आपल्याकडे धोरणात्मक ढाचा आहे आणि जगभरात अनेक समस्या असूनही आपण लक्षणीय प्रगती करत आहोत यामुळेही आपल्याला प्रोत्साहन मिळत असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आपल्याला अधिक सुधारणेची आवश्यकता आहे आणि सध्याच्या परिस्थितीवर मात करण्याची गरज आहे ज्यायोगे आपण दुर्बल सदस्य राष्ट्रांमधल्या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकू, या बाबी वर सर्वांचे एकमत झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
मानव इतिहासातल्या एका खडतर काळात आपल्याला दूर दृश्य प्रणाली द्वारे भेटणे भाग पडले आहे, येत्या दोन दशकात आपल्याला अनेक तातडीच्या आव्हानांना सामोरे जावे लागणार असल्याची आपल्याला जाणीव असूनही, आपण सर्वांनी एकत्र काम करण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला आहे, सर्वांसाठी सार्वत्रिक आरोग्याकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला कोणतेही कारण रोखु शकत नाही हे पाहून प्रोत्साहन मिळत असल्याचे ते म्हणाले.
सध्याच्या महामारीसारख्या आव्हानामुळे सर्वांनाच धोका असून त्यांचा मुकाबला करण्यासाठी एकत्रित प्रतिसादाची गरज असते असे मी याधीही सांगितले आहे त्याचा मी पुनरुच्चार करतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांची ही सामायिक जबाबदारी असून आपल्या संघटनेच्या विचाराचा हा गाभा आहे, असे त्यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात सर्वांकडून याच कटीबद्धतेची प्रचीती आल्याचे सांगून यामुळे आपल्या महान संघटनेविषयीचा अभिमान वृद्धींगत झाला असल्याचे डॉ हर्ष वर्धन म्हणाले.कोविड-19 ही महामारी म्हणून जाहीर झाल्यापासून मागच्या एक वर्षात संक्रमण रोखण्यात, मृत्यू कमी राखण्यात आपल्या एकत्रित प्रयत्नातून आपण सर्वांनी या महामारीविरोधात धैर्याने लढा दिल्याचे ते म्हणाले. या समारोपाच्या वेळी त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे 148 वे सत्र फलदायी आणि यशस्वी केल्याबद्दल सर्व प्रतिनिधी, उपाध्यक्ष, महा संचालक, प्रादेशिक संचालक आणि संबंधितांचे आभार मानले.